Rajan Salvi ACB Enquiry: एसीबी चौकशीनंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा 118% संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलाय. प्रदीर्घ चौकशीनंतर पोलिसांनी राजन साळवी यांना ताब्यात घेतले. राजन साळवी यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली होती. या कारवाईमुळे त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर, राजकीय सूडानं कारवाई केल्याची प्रतिक्रिया साळवी यांनी दिली आहे.
आमदार राजन साळवी यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त 118% संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी, पत्नी आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे. राजन साळवींच्या यांच्या घरी गुरुवारी सकाळीच एसीबीनं धाड टाकली. रत्नागिरी, राजापूरसह इतर ठिकाणी धाड टाकली. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. मालमत्ता प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी झालीय. आता एसीबीनं गुन्हा दाखल केल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झालीय. मात्र, अटकेला घाबरत नसून आपण जामिनासाठी अर्ज करणार नसल्याचं साळवींनी ठामपणे सांगितलं.
दरम्यान, पोलिसांनी राजन साळवी यांना ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर येत आहे. आरडीसी म्हणजेच रत्नागिरी जिल्हा बँकेतील लॉकर एसीबीच्या अधिकाऱ्यांना चेक करायचा आहे. त्यासाठी राजन साळवी यांना त्या ठिकाणी नेलं जाणार आहे. राजन साळवींना एसीबी अधिका-यांनी त्यांच्या घरातून बँकेकडे नेताना कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. साळवींना पोलिसांच्या वाहनातून नेण्यास शिवसैनिकांनी विरोध दर्शवला. त्यामुळे साळवींना चौकशीसाठी बँकेत नेताना त्यांच्या स्वत:च्या वाहनातून जाण्याची मुभा दिली. बँकेतील लॉकर तपासण्यासाठी एसीबी अधिका-यांनी साळवींना बँकेत नेले. सकाळपासून साळवींची त्यांच्या घरात चौकशी सुरू होती. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार राजन साळवी यांची वकिलांसोबत चर्चा सुरू आहे. तीन वकिलांची टीम सोबत राजन साळवी यांची चर्चा सुरू. अटक केल्यानंतरची रणनीती काय असेल यावर देखील चर्चा सुरू आहे.