'डेथ सर्टिफिकेट तयार आहे घेऊन जा'! जिंवत व्यक्तीलाच आला फोन

आरोग्य विभागाचा अजब कारभार, तांत्रिक कारणामुळे घोळ झाल्याचं सांगत सारवासारव

Updated: Jun 30, 2021, 04:24 PM IST
'डेथ सर्टिफिकेट तयार आहे घेऊन जा'! जिंवत व्यक्तीलाच आला फोन title=

कपिल राऊत, झी 24 तास, ठाणे : ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे महिलेला तीन डोस दिल्याचं उदाहरण ताजं असताना आता चक्क एका व्यक्तीला जिवंतपणी मृत घोषित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिवंत माणसाचं डेथ सर्टिफिकेट बनवून त्याच व्यक्तीला फोन करुन माहिती देण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय ठाण्यातील मानपाडा भागात राहणाऱ्या 55 वर्षीय चंद्रशेखर देसाई यांच्याबरोबर.

नेमका काय प्रकार घडला

ठाण्यातील मानपाडा इथं राहणाऱ्या चंद्रशेखर देसाई यांना ऑगस्ट 2020 रोजी कोरोनाची लागण झाली होती. या काळात होमक्वारंटाईन असलेले चंद्रशेखर देसाई बरे झाले. मंगळवारी संध्याकाळी चंद्रशेखर देसाई आपल्या घरी बसलेले असताना त्यांना ठाणे महापालिकेतून एक फोन आला. फोन करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने दिलेली माहिती ऐकून देसाई यांच्या पायाखालची वाळूच सरकली. महिला कर्मचाऱ्याने देसाई यांना नाव व पत्ता विचारला, यानंतर चंद्रशेखर देसाई हे कधी मृत झाले? आम्हाला नोंद करायची आहे? तसंच त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र तयार असल्याचं या महिलेने सांगितलं. हे ऐकून चंद्रशेखर देसाई यांना धक्काच बसला. 

देसाई यांनी घेतली महापालिकेत धाव

चंद्रशेखर देसाई यांनी त्वरित महापालिकेत धाव घेत आरोग्य विभागाकडे तक्रार केली. मी जिवंत असून मला मृत घोषित केल्याचा धक्कादायक प्रकार माझ्यासोबत घडला असल्याचे त्यांनी सांगितलं. पण हाच फोन जर माझ्या कुटूंबियांपैकी कोणाला केला असता तर अनर्थ झाला असता, त्यामुळे ठाणे महापालिकेने निदान नोंदणी व्यवस्थित करावी अशी मागणी देसाई यांनी केली आहे. 

महापालिकेने केली सारवासारव

यावर तांत्रिक कारणामुळे घोळ झाल्याचं सांगत ठाणे महापालिकेने सारवासारव केली. कोरोना रुग्णांची यादी पुणे आरोग्य विभागातून प्राप्त होत असल्याने अशी चूक झाली असावी. रुग्ण बाधित झाल्यानंतर बरा होईपर्यंत महापालिका पाठपुरावा करत असते. त्यानंतर कुटुंबातील कोणाला कोरोनाची लागण झाली आहे का अशी देखील विचारपूस करण्यात येते. मात्र अश्या स्वरूपाचा फोन गेला असल्याने पुन्हा अशी चूक होणार नाही अशी खबरदारी घेण्यात येईल असे पालिका अधिकारी यांनी सांगितलं.