डोंबिवलीहून 20 मिनिटांत ठाण्यात पोहोचा, दोन महिन्यात सुरू होतोय नवा पूल

Motagaon-Mankoli Bridge: डोंबिवलीहून आता 30 मिनिटांत ठाणे गाठता येणार आहे. त्यामुळं प्रवाशांचा निम्म्याहून अधिक वेळ वाचणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 19, 2023, 07:31 AM IST
डोंबिवलीहून 20 मिनिटांत ठाण्यात पोहोचा, दोन महिन्यात सुरू होतोय नवा पूल  title=
Thane to Dombival in 20 mins Motagaon Mankoli Creek Bridge To Be Ready soon

ठाणेः माणकोली (भिवंडी) ते मोठा गाव (डोंबिवली) या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर येत आहे. पूल येत्या दोन महिन्यात रहदारीसाठी खुला होईल अशी शक्यता आहे. अलीकडेच मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अधिकाऱ्यांनी पुलाच्या बांधकामाची पाहणी केली. (Mothagaon-Mankoli Bridge)
   
कल्याण- डोंबिवलीकरांना लवकरात ठाणे, मुंबई गाठता यावे यासाठी एमएमआरडीए मार्फत उल्हास खाडीवर माणकोली ते मोठागाव दरम्यान पुलाचे बांधकाम सुरू आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नानंतर या पुलाच्या बांधकामाला वेग आला असून या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

बांधकामाची पाहणी केली 

एम‌.एम.आर.डी.ए.चे कार्यकारी अभियंता अर्जुन कोरगावकर, केडीएमसी शहर अभियंता अर्जुन अहिरे, यांच्यासह युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी पुलाच्या बांधकामाची पाहणी केली आहे. यावेळी या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये या करीता विविध उपायोजनांवर चर्चा करण्यात आली उड्डाणपुलाचे व ईतर उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना संबंधित ठेकेदारास देण्यात आल्या आहेत. 

दोन महिन्यात खुला होण्याची शक्यता

माणकोली- मोठागाव पूल येत्या दोन महिन्यात रहदारीसाठी खुला करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली ते ठाणे प्रवासाचा वेळ निम्म्याने कमी होण्यास मदत होणार आहे. तसंच, सर्वसामान्यांना रेल्वेशिवाय वाहतूकचे अतिरिक्त पर्याय देखील उपलब्ध होणार आहे. यापूर्वी माणकोली भागात भूसंपादनाच्या समस्या निर्माण झाल्याने विलंब झाला होता. 

20 ते 30 मिनिटांत पोहोचणार 

दरम्यान, ठाण्याहून डोंबिवलीला रस्तामार्गे जाताना लागत असलेली उल्हास नदी ओलांडण्यासाठी सध्या कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याशिवाज दुसरा पूल नाहीये. त्यामुळं प्रवाशांना मुंबई-नाशिक महामार्गावरून राजनोली फाट्यामार्गे कोनगाव, दुगार्डी ते कल्याण पूर्वेहून फिरून यावे लागते. त्यामुळं डोंबिवली ते ठाणे प्रवासाचे अंतर कापण्यासाठी दीड तास लागतो. प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी माणकोलीजवळ पूल उभारण्यात येणार आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर हे अंतर अवघ्या 20 ते 30 मिनिटांवर येणार आहे. 

माणकोली ते मोठागावपर्यंत पूल बांधण्यासाठी 2013मध्ये प्रस्ताव मांडण्यात आला होता. उल्हास नदीवर 1225 मीटर लांब व 27.5 मीटर रुंद पूल प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, भूसंपादन प्रक्रिया लांबल्याने प्रत्यक्षात पुलाचे काम 18 सप्टेंबर 2016 रोजी सुरू झाले.