Mumbai Sion Road Over Bridge : मुंबईतील सायन रेल्वेस्टेशनबाहेरील पूल पाडण्याच्या कारवाईला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. स्थानिक शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पुलाच्या तोडकामाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारा हा पूल 110 वर्षं जुना आहे. रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी हा पूल तोडण्यात येणार होता. मात्र सध्या हे काम थांबवण्याच्या सूचना खासदार शेवाळेंनी दिल्या आहेत. मुंबईच्या शीव रेल्वे स्थानकावरील आरओबी ( रोड ओव्हर ब्रीज) च्या निष्कासनाला तूर्तास स्थगिती देण्याची सूचना शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या. स्थानिक जनतेचा विकासाला विरोध नाही, मात्र कोणतीही कारवाई करताना स्थानिक जनतेला विश्वासात घ्या, अशी विनंतीही खासदारांनी प्रशासनाला केली.
या संदर्भात शेवाळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मध्य रेल्वे, मुंबई महानगरपालिका एफ (उत्तर), जी (उत्तर) विभाग, रस्ते व वाहतूक विभाग आणि पुल विभाग, तसेच वाहतूक पोलीस विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी आणि धारावीतील स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर हा आरओबी तूर्तास निष्कासित करण्यात येणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
पूर्व द्रुतगती मार्गावरील सायनचा पूल 18 जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. हा पूल चार दिवस वाहतुकीसाठी बंद होता. पुलाच्या बेअरिंग बदलण्याचं काम करण्यात आलं. त्यासाठी शुक्रवारपासून वाहतूक बंद होती. हा ब्लॉक काल संपणं अपेक्षित होतं. पण काम वाढल्यामुळे आजपर्यंत हा ब्लॉक वाढवण्यात आला होता. मात्र आता ब्रीजवरील वाहतूक सुरु झाल्यान वाहनचालक आणि नागरिकांना थोड दिलासा मिळालाय.