Heat Stroke Death : महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, जळगावात शेतमजुराचा मृत्यू

Heat Stroke Death in Maharashtra :  उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. भर उन्हात दुपारी शेतात काम करताना शेतमजुराला चक्कर आली आणि शुद्ध हरपली. या शेतमजुराचा उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

Updated: Apr 12, 2023, 02:50 PM IST
Heat Stroke Death : महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, जळगावात शेतमजुराचा मृत्यू title=

Heat Stroke Death in Maharashtra : राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असताना दुसरीकडे काही ठिकाणी उकाडाही वाढला आहे. मुंबईतही तापमाना वाढ झालेली दिसून आली आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. शेतमजुराचा शेतात काम करताना उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी आहे.

पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील  प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण (36) हा शेतमजूर शेतात काम करत होता. उन्हामुळे त्याला चक्कर आल्याने तो शेतात खाली कोसळला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली आहे. प्रेमसिंग हा शेतीमजुरीचे काम आणि जेसीबी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. सोमवारी सकाळी शेती कामासाठी गेला असता दुपारी शेतात काम करताना चक्कर आली आणि शुद्ध हरपली.

शुद्ध गेल्याने त्यांना उठविण्यासाठी तोंडावर पाणी मारण्याचा सोबत असलेल्या दुसऱ्या मजूराने केला. मात्र, प्रेमसिंग याची काहीही हालचाल जाणवून आली नाही. त्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी या शेतमजुराला मृत घोषित केले. प्रेमसिंग यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

राज्यात उष्णतेचा पारा वाढलाय

राज्यात एप्रिल महिना तापदायक ठरतोय. कारण सर्वत्र उष्णतेचा पारा चढलाय.. पुण्यात तर रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद करण्यात आलीय. कोरेगाव पार्कमध्ये पारा 42.1 अंशांवर पोहोचला आहे. त्याशिवाय चंद्रपूर, सोलापूर, परभणी, जळवागात पारा चाळीशीपार पोहोचला. पुढील काही दिवस राज्यातल्या काही जिल्ह्यात उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळणार आहे. जळगावात उष्माघातामुळे काल एका व्यक्तीचा मृ्त्यू झाला. तेव्हा तापमान वाढत असताना नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आले आहे. 

मुंबईही तापली...

काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असताना मुंबईत तापमानाचा पारा वाढलेला दिसून आला आहे. (Temperature in Mumbai) उकाड्याने मुंबईकर रात्रीही हैराण झाला आहे. पूर्वेकडून आलेल्या उष्ण वाऱ्यांनी मुंबईला तीव्र चटके देण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी आणि मंगळवारी तापमानाची कमाल आणि किमान पातळी सरासरीपेक्षा थेट तीन ते चार अंशांनी वाढलेली दिसून आली. मुंबईत सोमवारी कमाल तापमान 37 तर किमान तापमान 26 अंशांवर गेले होते. त्यामुळे मुंबईकरांना दुपारी उन्हातून चालताना चांगल्याच घामटा निघाला. उन्हाचे चांगलेच चटके बसू लागले आहेत. 

एप्रिल महिना अधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णता वाढल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर जाणं टाळावे. जास्तीत जास्त पाणी प्यावे. जर उन्हाळ्यात शरिराचे तापमान सतत वाढत असेल, डोके दुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा निराशपणा जाणवत असेल तर त्वरीत डॉक्टरांकडे जावे.तसेच दुपारी 12 ते दुपारी 3 या दरम्यान घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.