मुंबई : विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. गेले तीन दिवस पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरु आहे. या चर्चेत सत्ताधारी पक्षाला जास्त वेळ दिला यावरून फडणवीस संतप्त झाले.
जवळपास ७ तास चर्चा झाली. त्यात विरोधी पक्षाला केवळ २ तास ४० मिनिटे इतकाच वेळ मिळाला. विरोधकांना कमी वेळ मिळाला. विरोधक आणि सत्ताधारी यांना समान वेळ मिळायला हवा. इथून पुढे समसमान वेळ मिळायला हवी अशी मागणी फडणवीस यांनी केली.
त्यांच्या या आक्षेपावर काँग्रेसचे नाना पटोले यांनी, 'ही वेळ कुणी आणली? काँग्रेस सदस्य बोललेच नाहीत. ही वेळेची आकडेवारी मनानेच आणली नाही ना? असा टोला लगावला. त्यावर सत्ताधारी बाकावरून "विरोधी पक्षनेते काल पिक्चर बघायला गेले होते, कसा होता पिक्चर" अशी फडणवीस त्यांची फिरकी घेण्यात आली.
पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी आधीच वेळ अपुरा मिळाल्याने फडणवीस संतापले होते. त्यातच सत्ताधारी पक्षाकडून डिचवले जाताच ते म्हणाले, "होय! मी काल बाहेर पिक्चर बघायला गेले होतो आणि 'डंके की चोट पे' सांगतो पिक्चर बघायला गेलो होतो.
त्यांच्या या वक्तव्याचा धागा पकडून जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, 'विरोधी पक्षनेते हा द काश्मीर फाईल्स चित्रपट इंटरवलनंतर फारच बोअर आहे. पण, या चित्रपटाने भरपूर गल्ला केलाय. त्या चित्रपट दिग्दर्शकाला त्यातील काही पैसे काश्मीरी पंडीताच्या घरासाठी दान करायला सांगा" अशी कोपरखळी लगावली.
तर, भाजप आमदार योगेश सागर यांनी खाली बसून बोलण्यास शेरेबाजी सुरु केली. त्यावर जयंत पाटील यांनीही, आमचे लोक जर खाली बसून बोलायला लागले तर चांगलीच पंचाईत होईल, असा टोला लगावला.
सभागृहात असे वातावरण तयार झाले असताना तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनीही मध्येच एक गुगली टाकली. विरोधी पक्षनेते काल चित्रपट पाहून आले. सभागृहात इतकी चर्चा होतेय. काय विरोधी पक्षनेते आम्हालाही न्यायचे ना चित्रपट बघायला, आम्हीही आलो असतो. आम्हालाही न्या चित्रपट बघायला, असे म्हणताच सभागृहात इतका वेळ तणावपूर्ण असेलेले वातावरण निवळले.