अत्यावश्यक सेवेचा वापर करून सांगलीत आलेल्या महिलेच्या आईला कोरोनाची लागण

लॉकडाऊनच्या  नियमांचे उल्लंघन, संबंधीत व्यक्तींवर गुन्हा दाखल 

Updated: Apr 25, 2020, 08:52 PM IST
अत्यावश्यक सेवेचा वापर करून सांगलीत आलेल्या महिलेच्या आईला कोरोनाची लागण title=

सांगली :  शिराळा तालुक्यातील निगडी गावातील कोरोना बाधित महिलेच्या आईचा रिपोर्ट पोझेटिव्ह आला आहे. १६ तारखेला ही महिला अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करून मुंबईहून निगडी खुर्द या गावी आली होती. याप्रकरणी तिच्या भावाचे आणि अन्य ११ जणांचे रिपोर्ट  निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत सांगलीमध्ये रुग्णांचे २९ रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहेत. त्यापैकी २६ जण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत. तर सध्या इतर दोन महिलांवर उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, कोरोनाचा फैलाव होत असल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. मुंबईतून आपल्या बहिणीला आणण्यासाठी भावाने अत्यावश्यक सेवेचा गैरउपयोग केल्याचं दृष्टीस आलं होतं. याप्रकरणी शिराळा तालुक्यातील निगडी खुर्द येथील त्या कोरोनाग्रस्त तरुणीला आणि तिच्या भावाला मुंबईहून आणणाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॅन्सरग्रस्त रुग्णाला उपचारासाठी मुंबईला नेण्यासाठी ऑनलाइन अत्यावश्यक सेवेचा पास वाहन चालकाने काढला होता.  कॅन्सरग्रस्त महिलेला उपचारासाठी मुंबईला नेण्यासाठी प्रदीप पाटील याने ऑनलाइन जिल्हा पोलीस प्रमुखांच्या परवानगीचा पास काढला होता. गणपती भालेकर, प्रदीप पाटील, रामचंद्र भालेकर यांच्यासह मुंबईतून आलेल्या भाऊ आणि कोरोना पॉझिटिव्ह बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.