कडक निर्बंध आणि संचारबंदीनंतरही राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढतीच

मागील 13 दिवसात तब्बल 21 हजार रुग्ण राज्यात वाढले

Updated: Apr 19, 2021, 03:01 PM IST
कडक निर्बंध आणि संचारबंदीनंतरही राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढतीच title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात आधी लागू केलेले कडक निर्बंध आणि त्यानंतर लागू केलेली संचारबंदी याचा रुग्णवाढ रोखण्यात फायदा होत नसल्याचं चित्र समोर आलंय. राज्यात कडक निर्बंध लागू केल्यापासून आतापर्यंत मागील 13 दिवसात तब्बल 21 हजार रुग्ण राज्यात वाढलेत. याचा ताण राज्यातील आरोग्य यंत्रणेवर येताना दिसतोय.

राज्यात अनेक ठिकाणी बेडस् उपलब्ध नाहीत. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. रेमडेसीवर इजेक्शन मिळत नाही अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात ही स्थिती निर्माण झालीय. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 5 एप्रिल पासून राज्यात कडक निर्बंध आणि विक एण्ड  लॉकडाऊन लागू केला.  

त्यादिवशी म्हणजेच 5 एप्रिल रोजी राज्यात 47,288 रुग्ण होते. त्यात दिवसेंदिवस वाढच होत होती. त्यामुळे राज्य सरकारने 14 एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केली. संचारबंदी लागू झाली त्या दिवशी 14 एप्रिल रोजी राज्यातील रुग्णांचा आकडा पोहचला होता 58,952 वर पोहोचला होता. 

संचारबंदी लागू झाल्यानंतर रुग्णवाढीचा वेग मंदावेल अशी अपेक्षा होती. मात्र चार दिवसात रुग्णसंख्या 58,952 वरून 68,331 वर पोहचली. चार दिवसात राज्यात 9 हजार 379 रुग्ण वाढले. शासनातर्फेही वारंवार लोकांना संचारबंदीचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय.

राज्य सरकारने राज्यभरात संचारबंदी लागू केली असली तरी त्याचा परिणाम प्रत्यक्ष ग्राऊंडवर दिसत नाही. त्यामुळेच संचारबंदी लावून कोरोनाची साखळी तोडण्याचं राज्य सरकारचं उद्दीष्ट्य साध्य होत नसल्याचं उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येतंय.

मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये संपूर्ण राज्यभर रस्त्यावर शुकशुकाट असायचा. मात्र आता तसं चित्र नाही. त्यामुळेच कोरोनाची साखळी तोडायची असेल, रुग्णवाढ रोखायची असेल तर राज्य सरकारला संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याशिवाय पर्याय नाही.