ठाणे : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे (Omicron Variant) संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून (south africa) डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंता वाढली असतानाच 14 ते 26 नोव्हेंबर दरम्यान 7 प्रवासी दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आल्याची माहिती समोर आली.
5 प्रवाशांचे आले अहवाल
या सातही प्रवाशांचा ठाणे महापालिकेने (thane municipal corporation) शोध घेऊन त्यांची चाचणी करण्यात आली. या प्रवाशांबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून ठाण्यात आलेल्या 5 प्रवाशांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 2 प्रवाशांना ठाण्यात येऊन 14 दिवसांहून अधिक कालावधी लोटल्याने धोका टळला होता.
तर इतर 5 प्रवाशांची ठाणे मनपाने कोरोना चाचणी करुन त्यांना एका विशेष ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलं होतं. आज या पाचही प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, ओमायक्रॉनचा धोका नसला तरी त्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज असल्याचं ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितलं आहे. ठाणे शहरातील सर्व पायाभूत सुविधा अद्ययावत ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.
तर नागरिकांनी नव्या विषाणूबाबत घाबरुन न जाता आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी असं आवाहन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी केलं आहे.
राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना विदेशातुन येणाऱ्या सर्व प्रवाश्यांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.