अलिबाग : रायगड (Raigad) जिल्ह्यातील किल्ले रायगडावर (Raigad fort) बुधवारी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा (Shivrajyabhishek ceremony) होणार आहे. दरम्यान, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने पोलिसांची नाकाबंदी केली आहे. पाचाड परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
किल्ले रायगडावर उद्या बुधवारी (23 जून) शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीतर्फे तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. या पार्शवभूमीवर पोलिसांनी रायगडची नाकाबंदी केली आहे. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शीघ्र कृतीदल पथकही सज्ज ठेवण्यात आले आहे.
कोरोनामुळे केवळ 20 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यातच सोहळा साजरा करण्यावरून दोन संस्थांमध्ये वाद झाला होता. हा वाद बैठकीत मिटला असला तरी पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे.
पाचाड इथे बॅरिगेटिंग करण्यात आले आहे. पाचाडला पोलीस छावणीचे रूप आले आहे. येथे चौकशी करूनच वाहने किंवा नागरिकांना पुढे सोडले जात आहे.