जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन कमी झाल्याचा फोन येताच आमदाराने लावली फिल्डिंग; MP, छत्तीसगडमधून आले तातडीने सिलेंडर

गोंदीया जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे

Updated: Apr 16, 2021, 04:02 PM IST
जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन कमी झाल्याचा फोन येताच आमदाराने लावली फिल्डिंग; MP, छत्तीसगडमधून आले तातडीने सिलेंडर title=

गोंदिया : विदर्भातील गोंदीया जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासू  लागला.  रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपल्याची माहिती मिळताच स्थानिक आमदार विनोद अग्रवाल यांनी रुग्णालय गाठले. आणि तत्काळ काही ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध केले.

कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासत असते. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन तुटवड्याची माहिती मिळताच स्थानिक आमदार विनोद अग्रवाल तेथे पोहचले. 

त्यांनी जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेशातून माजी मंत्री गौरीशंकर बिसेन यांच्या मदतीने 40 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले. तर छत्तीसगडमधील माजी मंत्री ब्रजमोहन अग्रवाल यांच्या माध्यमांतून 90 सिलेंडर उपलब्ध करून दिले. 

ऑक्सिजन उपलब्ध झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला, रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा झाला असता तर रुग्णांचा जीव धोक्यात गेला असता.  अपक्ष आमदार अग्रवाल यांनी केलेल्या कामाचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून कौतुक होत आहे.