जात पंचायतीचा जाच, तक्रार केली म्हणून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

समाजामध्ये परतायचं असल्यास 5 दारूच्या बाटल्या, 5 बोकड आणि 1 लाख रुपये रोख देण्याची केली होती मागणी 

Updated: Jul 21, 2021, 04:32 PM IST
जात पंचायतीचा जाच, तक्रार केली म्हणून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण title=

किरण ताजणे, झी मीडिया, पुणे : जात पंचायतीचा जाच काही केल्या कमी होत नाहीये. कायदा करूनही समाजात राजरोसपणे जात पंचायत भरवली जाते. इतकंच नव्हे तर न्यायासाठी पोलीस ठाण्यात प्रकरण गेलेलं असतांना तक्रादार महिलेलाच मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार सुसंस्कृत पुण्यात घडलाय. 

पुण्यातील एका पीडित महिलेने जात पंचायतीने समाजात बहिष्कृत केल्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. यावर संतापलेल्या जात पंचायतीतल्या लोकांनी महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पण ते इतक्यावरच थांबले नाहीत. तर या महिलेसह तिच्या कुटुबियांना पण जीवे मारण्याची धमकी दिली. 
याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने सहकार नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे रुपेश कुंभार, निखिल कुंभार आणि तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमका प्रकार काय घडला होता?

आईच्या मालमत्तेचा न्यायनिवाडा जात-पंचायतीसमोर करण्यास विरोध केल्यामळे जातपंचायतीने पीडित महिलेसह तिच्या कुटुंबियांना समाजातून एक वर्षासाठी बहिष्कृत केलं. एक वर्षाच्या आत समाजामध्ये परत यायचं असल्यास 5 दारूच्या बाटल्या, 5 बोकड आणि 1 लाख रुपये दंड रोख देण्याची मागणी जातपंचायतीने केली होती. तसंच याप्रकरणी कोर्ट कचेरी केल्यास समाजातून कायमस्वरुपी बहिष्कृत करण्याची धमकीही महिला आणि तिच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. इतकंच नाही तर एक वर्षाच्या आत समाजात परत न आल्यास कायामस्वरुपी बहिष्कृत करण्याचा इशाराही दिला, शिवाय जो कोणी संबंधितांना मदत करेल त्यांनाही जातीतून बहिष्कृत केलं जाईल अशी धमकी देण्यात आली होती. 

अनिसने केली कारवाईची मागणी

तक्रारदार महिलेने संशयित आरोपीचे नाव फिर्यादीत नोंदवल्याने हा सगळा प्रकार घडलाय. गेल्या वर्षी सासवड मध्ये हा प्रकार घडला होता. या प्रकरणी आता अनिसनेही आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून पुण्यातील सहकार नगर पोलिसांत जातपंचायतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जात पंचायतीच्या संदर्भात कायदा करूनही समाजातील विघातक कृत्य करणाऱ्यांना आळा का बसत नाही, पोलिसांनी अंमलबजावणी करूनही जात पंचायतीचा जाच का सुटत नाही असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होताय. त्यामुळे आता पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x