शिवसेनेला मोठा धक्का, तिसऱ्या अपत्यामुळे गमावावे लागले नगरसेवकपद

 मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) निर्णयामुळे एका नगरसेविकेला धक्का बसला आहे.  त्यांना आपले पद गमवावे लागले आहे.

Updated: May 26, 2021, 11:56 AM IST
शिवसेनेला मोठा धक्का, तिसऱ्या अपत्यामुळे गमावावे लागले नगरसेवकपद title=
संग्रहित छाया

सोलापूर :  मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) निर्णयामुळे शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 11मधील शिवसेना नगरसेविका अनिता मगर यांचे पद मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. मगर यांना तीन अपत्ये असून तिसरे अपत्य 12 सप्टेंबर 2011 नंतर झाल्याचे कारण देत हा निकाल दिल्याचे अ‍ॅड. अजित आळंगे यांनी सांगितले. भाग्यलक्ष्मी म्हंता यांनी त्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. 

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत (Solapur Municipal Corporation) भाजपकडून पराभूत झालेल्या भाग्यलक्ष्मी म्हंता यांनी मगर यांना तीन अपत्ये असून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. निवडणुकीसाठी मगर यांनी तिसरे अपत्य त्यांचे नसून सुनीता आणि दत्तात्रेय मगर यांचे असल्याचे भासवून जन्म दाखल्यावर 2011 रोजी दुरुस्त करुन आई- वडिलांचे नाव बदलल्याचेही त्यांचे म्हणणे होते.

मात्र, मूळ दाखल्यावर अनिता मगर याच त्यांच्या आई असल्याची नोंद आहे. मगर यांनी तिसरे अपत्य त्यांचे नसल्याबाबत सबळ पुरावा न्यायालयात सादर केला नाही. अन्य मुद्यांचा युक्‍तीवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठाने मगर यांची याचिका फेटाळून लावली. तर त्यांचे पद रद्द करण्याचा आदेश कायम ठेवला. 

मगर यांच्या वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी चार आठवड्यांची स्थगिती दिली आहे. म्हंता यांच्यातर्फे अ‍ॅड. आळंगे यांनी, तर अनिता मगर यांच्यावतीने अ‍ॅड. विश्‍वासराव देवकर आणि महापालिकेतर्फे अ‍ॅड. विश्‍वनाथ पाटील आणि सोलापूर न्यायालयातर्फे म्हंता यांच्याकडून अ‍ॅड.नीलेश ठोकडे यांनी काम पाहिल्याचेही मूळ याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी प्रसिध्द पत्रकाद्वारे सांगितले.