पवार आणि ठाकरे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचं राजकारणात पदार्पण

महाराष्ट्राला मिळणार नवं नेतृत्व...?

Updated: Nov 27, 2019, 11:47 AM IST
पवार आणि ठाकरे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचं राजकारणात पदार्पण title=

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे असे नेते आहेत. ज्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाहीत. आज ही या दोन्ही नेत्य़ांचं वर्चस्व महाराष्ट्रातील जनतेच्या मनात कायम आहे. त्यातच आज पवार आणि ठाकरे कुटुंबीयांच्या तिसरी पिढीनं आज राजकारणात पदार्पण केलं आहे. शरद पवारांचे नातू रोहित पवार आणि बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत प्रथमच आमदारपदाची शपथ घेतली. युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात जाण्याआधी सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. 

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन करिष्माई नेते. ज्यांची मोहिनी राज्यातील जनतेला नेहमीच पडली. आता या दोन करिष्माई नेत्यांच्या नातवांनी राजकीय रणांगणात प्रथमच पाऊल ठेवलं आहे. आता ठाकरे आणि पवार कुटुंबीयांच्या या भावी नेत्यांवर साऱ्या राज्यातील जनतेचं नक्कीच लक्ष लागून असेल.

रोहित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्या रुपात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या क्षितीजावर पवार आणि ठाकरे कुटुंबाताली दोन नवे चेहरे उदयाला आले आहेत. एकाच्या नावामागे पवार आणि दुसऱ्याच्या नावामागे ठाकरे नावाचा करिष्मा जरी असला तरी आता या दोघांवर खूप मोठी जबाबदारी असणार आहेत. कारण हे आहेत शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू. हे दोघेही तरुण आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्यांचं आतापर्यंतचं वागणंही खूप सभ्य आणि वडीलधाऱ्यांचा मान राखणारं असं राहिलंय. यामुळेच या दोघांकडूनही जनतेच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत.

शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोघे दिलदार शत्रू त्याचबरोबरच दिलदार मित्रही होते. राजकीय पटलावर दोघांना एकत्र आणण्याचा एक प्रयत्नही झाला होता. मात्र त्यावेळी आपल्याला दिलदार शत्रू पाहिजे असं म्हणंत बाळासाहेबांचा तो मैत्रीचा हात तेव्हा शरद पवारांनी पकडला नव्हता. मात्र त्या दोघांचं वैयक्तिक संबंध नेहमीच सलोख्याचे राहिले. आताच्या बदललेल्या राजकीय समीकरणांच्या निमित्तानं पवार आणि ठाकरे हे कुटंबीय आता एकाच पटलावर आले आहेत. आता आपल्या आजोबांच्या दिलदार मैत्रीचा वारसा जपण्याची जबाबदारी या दोघांवर आलीय. 

रोहितनं निवडणुकीत मोठी लढाई लढून ती जिंकली आहे. त्यामानानं आदित्यची लढाई सोपी होती. दोघेही प्रथमच आमदार झाले आहेत. आता त्यांच्यासमोर खरं आव्हान आहे ते आपल्या आजोबांचा मोठा वारसा पुढे नेण्याचं.