भंडारा जिल्ह्यात वाघाची दहशत, 3 जण जखमी

वाघाचे वास्तव्य कळताच वन विभागाने गस्त वाढविली

Updated: Jan 25, 2020, 05:08 PM IST
भंडारा जिल्ह्यात वाघाची दहशत, 3 जण जखमी

 भंडारा : जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या गोंडेखारी गावात वाघ दिसल्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे. आज सकाळच्या सुमारास गोंडेखारी गावातील काही नागरिक बाहेर फिरत असताना गावाशेजारी वाघ दिसल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

याची माहिती तुमसर वनविभागाला दिली असता वनविभागाची चम्मु गावात दाखल झाली. तर वाघ हा शेतात लपून बसला होता त्यानंतर वनाधिकारी व गावकऱ्यांनी फटाके फोडत वाघाला जंगलाच्या दिशेने पळवून लावले आहे. तरी सुद्धा गावा शेजारी वाघ दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गावालगत वन लागून आहे. मात्र या आधी कधी वाघाचे दर्शन झाले नव्हते मात्र आता या भागात वाघाचे वास्तव्य असल्याचे कळताच वन विभागाने आपली गस्त वाढविली आहे . 

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील बिनाखी गावाशेजारी वाघाची दहशत आहे. या वाघाला गावाबाहेर हकलावून देताना वाघाने लोकांच्या अंगावर हल्ला केला. या हल्ल्यात गावातील 3 जण गंभीर जखमी झाले. या जखमी व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दृश्यांत एका व्यक्तीला वाघाने घट्ट पकडून ठेवल्याचं दिसून येत आहे. काही काळ गावकऱ्यांचा थरकाप उडवणारी ही घटना होती.