आंबेडकरांनीच भिडे आणि एकबोटेंना वाचवण्याचा प्रयत्न केला, जयंत पाटलांचा पलटवार

सांगलीत भाजप वगळता सर्व पक्षांच्यावतीने 'संविधान बचाव' मार्च काढण्यात आला.

Updated: Jan 25, 2020, 05:07 PM IST
आंबेडकरांनीच भिडे आणि एकबोटेंना वाचवण्याचा प्रयत्न केला, जयंत पाटलांचा पलटवार  title=

रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : प्रकाश आंबेडकर यांना संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे गुन्हेगार वाटत असतील तर मग त्यांनी कोर्टात त्यांच्या विरोधात साक्ष का दिली नाही ? असा प्रश्न जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. सांगलीमध्ये काढण्यात आलेल्या एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात निघालेल्या रॅली दरम्यान ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सांगलीत भाजप वगळता सर्व पक्षांच्यावतीने 'संविधान बचाव' मार्च काढण्यात आला. या मार्च मध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह जिल्ह्यातून दोन हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते.

आंबेडकर यांनी एकबोटे आणि भिडे यांच्या विरोधात न्यायालयात कोणताही उल्लेख केला नाही याचा अर्थ प्रकाश आंबेडकर हे भिडे आणि एकबोटे यांना अप्रत्यक्षपणे वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला.

ज्यांनी दंगल घडवून षडयंत्र केलं त्या सर्वांना प्रायश्चित्त आणि शासन व्हावं हीच आमची प्रमुख मागणी आहे. मग यात संभाजी भिडे, एकबोटे किंवा जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे. भीमा कोरेगाव संदर्भात आमचे नेते शरद पवार यांनी चौकशीची मागणी केली होती.

भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या चौकशीबाबत महाराष्ट्रातील जनता समाधानी नाही. काहीतरी वेगळा विचार डोक्यात ठेवून केंद्र सरकारने आता भीमा-कोरेगाव संदर्भात एनआयएकडून चौकशी सुरू केली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने एसआयटी नेमून या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं असेही ते म्हणाले.