झोपडीतच गाठले यशाचे शिखर; तिवसा गावचा सुपुत्र नायब तहसीलदार

 हातावर पोट असणाऱ्या एका छोट्या कुटुंबातील तरुणाने घवघवीत यश मिळवत नायब तहसीलदार होण्याची किमया साधली.

Updated: Jun 25, 2020, 01:21 PM IST
झोपडीतच गाठले यशाचे शिखर; तिवसा गावचा सुपुत्र नायब तहसीलदार

अनिरुद्ध दवाळे, अमरावती : तिवस्यात हातावर पोट असणाऱ्या एका छोट्या कुटुंबातील तरुणाने महाराष्ट्र राज्यसेवेच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. अक्षय बाबूराव गडलिंग असे या तरुणाचे नाव आहे. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असल्याने भविष्यात त्याने मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. हे स्वप्न सत्यात उतरविल्याने त्यांच्या आई-वडिलांना कोन भरुन आनंद झाला आहे.

मेहनतीच्या जोरावर यश 

अक्षयचे वडील गेल्या कित्येक वर्षांपासून गावोगावी सायकलने फिरुन भंगार खेरेदी करतात आणि त्याबदलात रांगोळी विकण्याचा व्यवसाय करतात. वडीलांची मुलाला अधिकारी बनविण्याची धडपड आणि मेहनत डोळ्यासमोर ठेऊन अक्षयने त्याच्या जिद्दीची वात तेवत ठेवली. अक्षय आता नायब तहसिलदार झाला आहे. कुटुंबाच्या गरीब परिस्थितीच्या खडतर मार्गातून मेहनतीच्या जोरावर त्याने यश गाठले आहे. 

घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल 

अक्षय गडलिंग हा तिवसा येथे राहतो. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असल्याने भविष्यात त्याने मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यासाठी त्याने प्रयत्नांची परिकाष्ठा केली. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अक्षय महागडे शिकवणी वर्ग लावू शकत नव्हता. त्यामूळे त्याने विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शिकवणी वर्गात प्रवेश घेतला. त्याने दिल्ली येथील शिकवणी वर्गात तसेच तिवस्यातील राजश्री शाहू महाराज वाचनालयात तासनतास बसून अभ्यासाचे धडे गिरवले. गेल्यावेळी तहसीलदार पदासाठी तीन गुणांनी नापास झालेला अक्षय खचून न जाता पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागला आणि त्याने यश मिळविले.

यशाचे सर्व श्रेय आई-वडिलांना

अक्षय त्याला मिळालेल्या या यशाचे सर्व श्रेय आई-वडिलांना, मित्रांना आणि शिक्षकांना देतो. अक्षय सांगतो, की 'माझे बाबा नववी पास तर आई चौथी शिकलेली आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने वडील भंगार, रद्दी गोळा करण्याचा व्यवसाय करताना तर आई मोलमजुरी करते. असे असूनही त्यांनी गरिबीची झळ मला कधीच पोहचू दिली नाही.

बोरकर यांचे मोफत शिकवणी वर्ग 

सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेले आशिष बोरकर हे तिवसा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना ते राज्य सेवा आयोगाची तयारी करणाऱ्या मुलांचे मोफत शिकवणी वर्ग घ्यायचे. याच दरम्यान त्यांची अक्षय गडलिंग याच्याशी भेट झाली. अक्षयची अभ्यासाविषयीची तळमळ बघून आशिष बोरकर यांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्याला अनेक महागडी पुस्तके उपलब्ध करून दिली. तसेच वेळप्रसंगी आर्थिक मदत केली. दरम्यान, अक्षयच्या या यशाबद्दल त्यांनी त्याचे कौतुक केले आहे.