योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : राज्यात सध्या टोमॅटोची आवक कमी झाल्यानं भाव वाढलेत... महानगरात टोमॅटो शंभरीपार गेलाय... भारतातच नव्हे तर पाकिस्तानलाही निर्यात करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात ६० ते ८० रुपये किलो भाव सर्वसामान्यांना मिळत असल्यानं जेवणाला चव देणारा टोमॅटो चांगलाच भाव खाऊन जातोय.
राज्यात सध्या ३० हजार हेक्टर क्षेत्र टोमॅटो लागवडीखाली आहे. त्यात एकट्या नाशिक जिल्ह्यात दहा ते बारा हजार हेक्टर आहे. मात्र एक हंगाम पेरणी जून महिन्यात तर दुसरी ऑगस्ट-सप्टेबरमध्ये होते. त्यामुळे टोमॅटोची आवक सुरु होते ती ऑगस्टपासून... दररोज एक ते दीड लाख क्रेट टोमॅटो बाजारात येऊ लागतो. गुजरात, मध्य प्रदेश, बंगळुरु, गोवा अशा अनेक राज्यांसह पाकिस्तानात हा टोमॅटा पुरविला जातो.
मात्र, यावेळेस जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यानं थोडाफार लवकर पेरणी झालेल्या टोमॅटोची अवकाळी पावसानं फुलगळ झाली. त्यात थंडीमुळे वीस टक्के माल निघतोय. त्यामुळे थोडीफार झालेली आवकही कमी झालीय.
एकरी दहा जाळ्या निघत असल्यानं सातशे ते नऊशे रुपयानं वीस किलोला जाळी विकली जाते. प्रत्येक किलोला हा भाव नाशिकमध्ये ४० रुपये ते ४५ रुपये मिळतोय. मात्र आवक कमी झाल्यानं निर्यातही खुंटलीय. महानगरात जाताना हा भाव साधारणतः दुप्पट होतो. सध्या नगर, नाशिक जिल्ह्यात आवक सुरु आहे. राज्यात नाशिक, अहमदनगर, सांगली, पुणे, सातारा, नागपूर भागात टोमॅटो होतो. ऑगस्ट ते डिसेंबर अखेरपर्यंत तसंच हिमाचल आणि बंगळुरु परिसरातून मे ते ऑगस्टपर्यंत भारतातील सर्व राज्यात पुरवठा होतो. सध्या राज्यातूनच आवक कमी झाल्यानं हा प्रश्न निर्माण झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
राज्यात तीन हंगामात होणारा टोमॅटो हा नेहमीच जून, जुलैत भाव खाऊन जातो मात्र या वर्षी सप्टेंबरमध्ये नैसर्गिक आपत्तीनं शेतकऱ्याला दोन पैसे मिळत असले तरी ते तुलनेत कमीच आहेत. थंडी अशीच राहिली तर येत्या काळात उत्पादन घटून हीच परिस्थिती कायम राहू शकते मात्र आवक वाढल्यास पंधरा दिवसात भाव उतरू शकतात. त्यामुळे आता निसर्गावर भावाचं गणित अवलंबून आहे हेच खरं...