अंबरनाथच्या मलंगगड परिसरात पर्यटकांची तूफान गर्दी

पर्यटकांनी अक्षरशः जीवघेणी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

Updated: Jul 14, 2021, 08:11 PM IST
अंबरनाथच्या मलंगगड परिसरात पर्यटकांची तूफान गर्दी title=

चंद्रशेखर भुयार, अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात निसर्गरम्य ठिकाणांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतंय. अशाच गर्दीचा कुशिवली गावाजवळील नदीतला एक व्हिडिओ समोर आला असून यात पर्यटकांनी अक्षरशः जीवघेणी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ठाणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसे मनाई आदेश सुद्धा जारी केले आहेत. मात्र तरीही पर्यटक नदी, धबधबे अशा ठिकाणी गर्दी करत असल्याचं दिसतंय. या पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून फक्त विकेंडला नाकाबंदी आणि गस्त ठेवली जाते. त्यामुळे इतर दिवशी पर्यटनस्थळी पर्यटक मोठी जीवघेणी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतं.

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात कुशिवली गावाजवळ असलेल्या नदीत मंगळवारी पर्यटकांनी अशीच तुफान गर्दी केली होती. या गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पर्यटन स्थळांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र तरीही अशा पद्धतीने पर्यटनस्थळी गर्दी होतेय. त्यामुळे पोलिसांनी दररोज या ठिकाणी गस्त ठेवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.