पुण्यात आणखी एक अपघात! सायकल चालवणाऱ्या 10 वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं... मन सुन्न करणारा Video

Pune Crime News: कार शिकत असताना एका 10 वर्षांच्या चिमुरड्याच्या अंगावरुन गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 19, 2024, 07:13 PM IST
पुण्यात आणखी एक अपघात! सायकल चालवणाऱ्या 10 वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं... मन सुन्न करणारा Video title=
Tragic accident claims life of 11-year-old boy Horrific video viral

Pune Crime News: चारचाकी गाडी शिकत असताना सायकल खेळत असलेल्या दहा वर्षांच्या मुलाला जबर धडक बसून झालेल्या अपघातात 10 वर्षांच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की मुलगा पुढच्या व मागील चाकाखाली चिरडला गेल्याने गंभीर जखमी झाला होता. मात्र उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे मंगळवार दि.१८ रोजी सायंकाळच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये दहा वर्षाचा समर्थ सुशील शिंदे (वय १० रा.भिगवण ता.इंदापुर जि. पुणे) हा गंभीर जखमी होऊन ठार झाला आहे. या अपघाताचा थरार व अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये समर्थ याच्या अंगावरून पुढील व मागील चाक गेल्याचे स्पष्ट दिसत आहे.

समर्थच्या या अपघाती मृत्यूने भिगवण व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नव्हता. भिगवणमध्ये ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामामुळे विद्युत पुरवठा खंडित असल्याने गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 
मंगळवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील मासळी बाजाराच्या आवारात एकजण चारचाकी वाहन चालवण्यास शिकत होता. यावेळी त्याच भागात समर्थ  सायकल खेळत होता. कार वळवत असताना बाजूने समर्थ शिंदे हा चिमुकला सायकलवर आलेला दिसत आहे. या वळणाच्या काही क्षणात समर्थला वाहनाची धडक बसते व समर्थची सायकल बाजुला फेकली जाते तर समर्थ हा गाडीच्या पुढच्या व नंतर मागच्या चाकाखाली चिरडलेला दिसत आहे.

अपघातांनातर लगेच त्याला उचलून पळवत दवाखान्यात नेण्यात आले. मात्र गंभीर अवस्थेत असलेल्या समर्थला पुढील उपचारासाठी हडपसर येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र आज बुधवारी समर्थच्या मृत्यूची बातमी सकाळी भिगवणकरांना  समजली आणि सर्वजण स्तब्ध झाले. सकाळी शोकाकुल वातावरणात समर्थ याच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.