त्र्यंबकचा वाद पेटला! मंदिरात इतर धर्मियांना प्रवेशबंदी, पायऱ्यांवर हिंदू समाजाकडून शुद्धीकरण...

राज्याच्या काही भागात जातीय दंगली उसळल्यात. तर दुसरीकडं त्र्यंबकेश्वर मंदिरातीतल धार्मिक वादही वाढत चाललाय. काही मुस्लीम तरुणांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिंदू संघटनांनी मंदिर शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतलीय

योगेश खरे | Updated: May 17, 2023, 06:45 PM IST
त्र्यंबकचा वाद पेटला! मंदिरात इतर धर्मियांना प्रवेशबंदी, पायऱ्यांवर हिंदू समाजाकडून शुद्धीकरण... title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : आद्य ज्योतिर्लिंग असलेली त्र्यंबकेश्वर नगरी. सध्या इथलं वातावरण चांगलंच तापलंय. कारण काही मुस्लीम तरुणांनी धूप दाखवण्याच्या प्रथेच्या नावाखाली त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा (Trimbakeshwar Mandir) प्रयत्न केला. त्यावरून नवा वाद सुरू झालाय. मंदिरात मुस्लीम तरुण घुसल्याच्या घटनेनंतर सकल हिंदू समाजानं या वादात उडी घेतली... बुधवारी मंदिराच्या पायऱ्यांवर गोमूत्र शिंपडून संघटनेनं शुद्धीकरणाची (Purification) मोहीम हाती घेतली.

सकल हिंदू संघटनेकडून शुद्धीकरण
मंदिराच्या पायऱ्यांवर शुद्धीकरण करण्यात आलं आहे, यापुढे कोणतंही अधर्मिय पाऊल मंदिरकडे येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असं सकल हिंदू सघटनेचे नेते आनंद दवे यांनी म्हटलंय. पोलिसांकडे सर्व पुरावे असूनही ते अटक का करत नाहीत, असा सवाल उपस्थित करत पोलिसांना निवेदन दिलं जाणार असून 72 तासांची मुदत देणार आहोत, कारवाई झाली नाही तर महाराष्ट्राभर त्याचा उद्रेक दिसेल असा इशाराच आनंद दवे यांनी दिला आहे. 

एसआयटीमार्फत चौकशी
राज्य सरकारनं याप्रकरणी एसआयटीमार्फत (ATS) चौकशी सुरू केलीय. तर दुसरीकडं यावरून राजकीय वादही चांगलाच गाजतोय. त्र्यंबकेश्वरमध्ये संदलची धूप दाखवण्याची प्रथा100 वर्षांपूर्वीपासून सुरू असल्याचा दावा संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलाय. मुस्लीम समाजाचे एक सुफी संत आहेत, त्यांची ही संदल प्रथा असते. मंदिराच्या दरवाजावर धुप दाखवून ते पुढे जात असल्याची परंपरा आहे असं राऊत यांनी म्हटलंय. 

तुषार भोसलेंची टीका
तर अशी कोणतीही प्रथा त्र्यंबकेश्वर मंदिरात नाही. अशी कोणतीही प्रथा नसताना संजय राऊत यांना आत्मसाक्षात्कार कोणी दिला? असा सवाल भाजपच्या तुषार भोसले यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी हिंदुत्व सोडलं आहे, यावर आज संजय राऊत यांनीच शिक्कामोर्तब केल्याचं सांगत राऊतांनी हिंदू समाजाची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या तुषार भोसले यांनी केलीय.

संदल प्रथा बंद करण्याचा निर्णय?
दरम्यान, त्र्यंबकेश्वरील जातीय सलोखा बिघडू नये यासाठी बुधवारी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये (Trimbakeshwar Nagarpalika) सामाजिक सलोखा समितीची बैठक झाली. त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष, सर्व राजकीय पक्षांचे आणि धर्मांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेरची संदल आणि धुनी प्रथा बंद करण्याचा निर्णय मुस्लीम समाजानं घेतलाय.. गावाला सलोख्याची परंपरा आहे, संदलप्रथा मान्य नसेल तर बंद करु अशी भूमिका त्र्यंबकेश्वरमधल्या नाराज मुस्लिम समाजानं घेतलीय.

मंदिराभोवती पोलिसांचा ताफा
दरम्यान, त्र्यंबकेश्वर शहरात वाढता तणाव बघता ग्रामीण पोलिसांनी विशेष स्ट्राइकिंग फोर्स तैनात केली आहे. मंदिराभोवती पोलिसांचा ताफा वाढवण्यात आला आहे. जातीय दंगलींमुळं महाराष्ट्रातलं वातावरण सध्या कलुषित झालंय. त्यात त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या या वादानं भर टाकलीय... बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दरबारात जातीय आणि धार्मिक वादाची पेटलेली ही ठिणगी आणखी पेटणार नाही, याची काळजी घ्यायला हवी...