अहमदनगर : हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची तक्रार करण्यासाठी, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी, आम्ही अहमदनगरच्या पोलीस अधिक्षकांची भेट घेत आहोत. इंदुरीकर यांनी अनेकवेळा कीर्तनातून महिलांचा अपमान केला आहे. म्हणून इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
तर अहमदनगरमध्ये इंदुरीकर समर्थक आणि तृप्ती देसाई समर्थक आमने-सामने येण्याची शक्यता आहे, कारण इंदुरीकर समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
तर दुसरीकडे इंदुरीकर समर्थकांची संख्या आणि पाठीराख्यांची संख्या वाढत असताना, तृप्ती देसाई यांनी आपल्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं, तर संपूर्णपणे इंदुरीकरच जबाबदार असतील असं म्हटलं आहे.
इंदुरीकरांविरोधात भूमिका घेतली म्हणून शिवसेनेच्या स्मिता अष्टेकर यांनी तृप्ती देसाई यांनी धमकी दिली होती, त्यानंतरही तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर यांच्यावर टीकास्त्र डागलं होतं.
सम तारखेला संभोग केला तर मुलगा जन्माला येतो, आणि विषम तारखेला संभोग केला तर मुलगी जन्माला येते, असं वक्तव्य इंदुरीकर यांनी एका कीर्तनातून केल्यानंतर या वादाला सुरूवात झाली आहे. यानंतर इंदुरीकर यांनी हे आपलं मत नसून ग्रंथात हा उल्लेख असल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणी इंदुरीकर यांनी माफी देखील मागितली आहे.