नाशिक सिडको नागरिक अस्वस्थ, तुकाराम मुंढे मागे हटणार?

याबाबत कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. नागरिकांनी अनधिकृत बांधकाम पाडावं, अन्यथा ३१ मे नंतर कारवाई केली जाईल असं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलंय

Shubhangi Palve Updated: May 26, 2018, 10:54 PM IST
नाशिक सिडको नागरिक अस्वस्थ, तुकाराम मुंढे मागे हटणार? title=

किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक : नाशिकच्या सिडकोतली अनधिकृत बांधकामं थांबवण्याबाबत कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे ३१ मे नंतर बेकायदा बांधकामं पाडली जाणार असल्याचं, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे सिडकोमधील नागरिकांमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण झालीय. नाशिक शहरात अनधिकृत बांधकामं पाडण्याची मोहीम महापालिकेकडून जोरदारपणे राबवली जात आहे. तर नाशिकच्या सिडको परिसरात लाल रंगानं काही ठिकाणी रेखांकन करण्यात आलंय. या सिडको परिसरात जवळपास सहा स्कीम आहेत. त्यातली रस्ते आणि ड्रेनेज लाईनवरची सर्वच बांधकामं हटवायचा निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलाय. याच अतिक्रमणाबाबत स्थगितीची मागणी करून ती तूर्तास थांबवली असल्याची माहिती आमदार सीमा हीरे यांनी दिली होती. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता.  

मात्र, याबाबत कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. नागरिकांनी अनधिकृत बांधकाम पाडावं, अन्यथा ३१ मे नंतर कारवाई केली जाईल असं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलंय... तसंच रस्ते आणि चौकातल्या अतिक्रमणांबाबत नोटिसा देण्याची गरज नसते, तसा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याचंही मुंढेंनी सांगितलंय.  

दरम्यान, आयुक्त मुंढे त्यांच्या भूमिकेवर ठाम असले तरी सिडकोवासीय आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत... तर बांधकाम पाडण्यात आल्यास बुलडोझर खाली जाण्याचा इशारा सिडकोवासियांनी दर्शवलीय.  

एकूणच नाशिक शहरात अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध लोकप्रतिनिधींसह नागरिक असा वाद येत्या दिवसांत आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत.