अहमदनगर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या राज्यातील दुष्काळी भागाचा पाहाणी दौरा करत आहेत. आज उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीची पाहाणी करतील. त्याचसोबत आयोजीत करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार असल्याचंही सांगण्यात आले आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आज अहमदनगरमधील अनेक युवा कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादमधील काही गावांचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्यात विमा कंपन्यांना कडक इशारा दिला आहे शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या आणि त्यांना लुबाडणाऱ्या बँका आणि कंपन्यांची मुंबईतील कार्यालये बंद पाडण्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शनिवारी औरंगाबादच्या लासूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध सरकारी योजनांमध्ये दलालांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या योजनांचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. काही बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याचेही समोर आले आहे. तसेच अनेक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे हडप केले. अशाप्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कंपन्यांची मुंबईतील कार्यालये शिवसेना बंद पाडले, असा इशारा यावेळी उद्धव यांनी दिला.