Mumbai News: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले. तसंच, भाजपच्या नेत्यांच्या भेटी गाठीदेखील घेतल्या. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जे. पी नड्डा यांनी राज्यातील भाजप नेत्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांच्या नरेटिव्हला त्याच भाषेत प्रत्युत्तर द्या, असे आदेश भाजप नेत्यांना दिले आहेत. तसंच, विधानसभेसाठी पक्षाची रणनिती काय असेल, याबाबतही त्यांनी नेत्यांना सूचना दिल्या आहेत.
जे.पी. नड्डा यांनी राज्यातील भाजप नेत्यांची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, पीयूष गोयल, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले होते. त्यानंतर आता लगेचच विधानसभा निवडणुका आहेत. त्या दृष्टीने भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेत महाविकास आघाडीने फेक नरेटिव्ह सेट केले, आता विरोधकांच्या नरेटिव्हला त्याच भाषेत प्रत्युत्तर द्या, असे आदेश नड्डा यांनी बैठकीत दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
विरोधकांच्या फेक नेरेटिव्हला उत्तर देताना विकासाचा अजेंडाही पुढे घेऊन जा. केंद्र सरकारने घेतलेले निर्णय लोकांपुढे घेऊन जा, असंही त्यांनी म्हटलं आहे. आपल्याकडे अनेक मुद्दे आहेत त्यावरुन आंदोलने करून मविआला घेरा, असे निर्देशही त्यांनी महाराष्ट्र भाजपला दिले आहेत. तसंच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानावरुन राहुल गांधींचे आरक्षण विरोधी विधान समाजापर्यंत पोहोचवा, अशा सूचनाही भाजप नेत्यांना केल्या आहेत. जवळपास दीड तास भाजप नेते आणि नड्डा यांच्यात चर्चा झाली होती.
दरम्यान, यावेळी जे.पी नड्डा यांनी भाजप नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. मोठ्या भावाची भूमिका बजावताना दोन्ही भावांना सांभाळून घ्या. तसंच, निवडणुकीत शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही सोबत घ्या, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळं आगामी काळात फेक नरेटिव्हवरुन भाजप व महायुती मविआला घेरणार असल्याची स्पष्ट आहे.