पेट्रोलचे दर गगनाला भिडत असताना उल्हासनगरात व्यापाऱ्याची तर मुंबईत मनसेची भन्नाट ऑफर

पेट्रोलचे दर शंभरी जवळ पोहोचल्याने भन्नाट ऑफर...

Updated: Mar 9, 2021, 11:07 PM IST
पेट्रोलचे दर गगनाला भिडत असताना उल्हासनगरात व्यापाऱ्याची तर मुंबईत मनसेची भन्नाट ऑफर

चंद्रशेखर भुयार, उल्हासनगर : पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यावरून अनेक जोक-मिम्स फिरत आहेत. आता तर चक्क पडदे आणि चादरी खपवण्यासाठी एका व्यापाऱ्यानं पेट्रोलची ऑफर देऊ केली आहे. उल्हासनगरच्या शिरू चौकात शितल हे कापडाचं दुकान आहे. त्याचे मालक ललित शिवकानी यांनी दुकानाबाहेर असा बोर्डच लावला आहे. किमान 1 हजाराची खरेदी करा आणि 1 लीटर पेट्रोल फ्री मिळवा, अशी ऑफर त्यांनी दिलीय आहे. 

या ऑफरमुळे ग्राहकही खूश असून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. उल्हासनगरात अशी ऑफर असताना मुंबईतही मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त पेट्रोलवर ऑफर देण्यात आली आहे. चारकोपच्या एका पंपावर 15व्या वर्धापनदिनानिमित्त 15 रुपयांची सूट देण्यात येते आहे. एकूणच सेंच्युरीला पोहोचल्यामुळे आता पेट्रोलही गिफ्ट म्हणून दिलं जात असल्याचं दिसतं आहे.

वर्षभरापूर्वी मुंबईत पेट्रोल 78 रुपयांच्या आसपास होतं. 6 महिन्यांपूर्वी ते 87 रुपयांच्या घरात पोहोचलं. नंतर 3 महिने भाव बऱ्यापैकी स्थीर राहिले. मात्र महिन्याभरापूर्वी पेट्रोलनं नव्वदी पार केली. तर आता पेट्रोलचा दर 97 ते 99 रुपयांच्या दरम्यान वरखाली होतो आहे.