कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : समलैंगिक विवाहाला समाजात आता कुठं काहीशी मान्यता मिळत आहे. पण ट्रान्सजेंडर जोडप्यांच्या विवाहाला अजून समाजात मान्यता नाही. पण अशाच एका ट्रान्सजेंडर जोडप्याच्या अनोखा विवाह सोहळा नुकताच पार पडला.
महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवडमध्ये शहरात हा विवाह सोहळा पार पडला आहे. ट्रान्सवुमन (Transwomen) आणि ट्रान्समेन (Transmen) हे दोघे विवाह बंधनात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच महापालिकेत नोकरीला लागलेले हे जोडपे लग्न बेडीत अडकले आहे.
रूपा टाकसाळ आणि प्रेम लोटलीकर अस या ट्रान्सजेंडर जोडप्याचे नाव आहे. रुपा आणि प्रेम यांची एक वर्षांपूर्वी भेट झाली होती. दोघांना एकमेकांचे विचार पटले. हळूहळू ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
पण प्रेम दुसऱ्या शहरात काम करत असल्याने अडचण होती. पण पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने महापालिकेत ट्रान्सजेंडर आणि त्रितीयपंथीयांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला आणि या दोघांना प्रचंड आनंद झाला. रूपा महापालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाली तर प्रेम ग्रीन मार्शल म्हणून काम करु लागला.
रुपाला वाढदिवसादिवशी प्रेम ने लग्नाची मागणी घातली होती. आपण जुलै महिन्यात विवाह करायचा अशी शपथ दोघांनी घेतली होती. त्यानंतर त्यांनी मोजक्या लोकांत 17 जुलै ला विवाह केला.
आम्हालाही प्रेमाची भावना आहे, आम्हाला ही कुटुंब असावं असे वाटते. त्याच भावनेतून आम्ही विवाह केल्याचे या जोडप्याने म्हटले आहे. लग्नानंतर दोघेही कामावर ही रुजू झाले आहेत.
दरम्यान, रूपा टाकसाळ ही मेल टू ट्रान्सवूमन झालेली आहे. तर, प्रेम हा फिमेल टू ट्रान्समेन झालेला आहे. पुण्यातील ट्रान्सजेंडर दवाखान्यात रूपा काम करायची. प्रेम देखील ठाण्यातील ट्रान्सजेंडर दवाखान्यात काम करत असत. त्या निमित्ताने त्यांचं तीन दिवसांच प्रशिक्षण ठाण्यात आयोजित करण्यात आलं होतं, तिथं दोघे एकत्र आले, त्यांची ओळख झाली. ओळखीच रूपांतर मैत्रीत झालं. या प्रेमविवाहाला प्रेमच्या घराच्या व्यक्तींनी विरोध केला होता. तो झुगारून प्रेम आणि रूपा यांनी लग्नगाठ बांधली आहे.