चंद्रपुरात रंगली अनोख्या लग्न वरातीची चर्चा

Updated: May 24, 2018, 10:04 PM IST

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातल्या एका लग्न वरातीनं चंद्रपूरकरांचं लक्ष वेधून घेतलं. आजच्या घडीला धुमधडाक्यात लग्न करणं ही जणू आवश्यक गोष्ट झाली आहे. लग्नातली वरात आणि ध्वनी प्रदुषण करणाऱ्या आधुनिक वाद्यांमुळे अवाजवी खर्चही ठरलेलालच असतो. अशा परिस्थितीत जुन्याच पारंपरिक पद्धतीनं लग्न वरात काढण्याचा निर्णय, चंद्रपूरच्या फाले कुटुंबातल्या नवरदेवानं घेतला.

त्याच्या या निर्णयाला त्याच्या कुटुंबीयांचीही साथ लाभली. हा नवरदेव आणि वऱ्हाडी चक्क रेंगी आणि बैलबंडीवर स्वार होऊन लग्न मंडपात दाखल झाले. या वरातीसमोर पारंपारिक वाद्य वाजवली जात होती आणि या वाद्यावर नवरदेवासह वऱ्हाडी बेधुंद थिरकले.

आजच्या पिढीला अवाजवी खर्च टाळून जुन्या पारंपरिक पद्धतीनं लग्न वरात काढण्याचा संदेश देणं, हा यामागचा मुख्य उद्देश होता.