मुंबई : Unseasonal rains in Maharashtra : राज्यात कालपासून सुरु झालेल्या पाऊस रात्रीही कोसळत होता. आता पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्याला ऑरेंज तर मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर अवकाळी पावसाचा भाज्यांना फटका बसला असून किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव शंभरी पार गेले आहेत. उत्पादन घटल्यामुळे भाज्यांचे भाव कडाडले आहेत.
संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ दिसून येत आहे. रात्रीपासून पावसाला जोर दिसून आला. मात्र, सकाळी पावसाने थोडी उसंत घेतली आहे. कोकण, उत्तर, मध्य महाराष्ट्रात उद्यापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पालघर, धुळे, नाशिक, नंदूरबारमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुढील 48 तासांत 70 ते 120 मिमी पावसाचा इशारा दिला आहे.
ऐन डिसेंबरच्या सुरूवातीला मुंबई आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. मुंबई, कोकण, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात ३ डिसेंबरपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह हा पाऊस राहणार आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाण्य़ाला यलो अलर्ट दिला आहे. तर पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय. पुढील 48 तासांत 70 ते 120 मि.मी. पाऊस होण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याने वर्तवली आहे.
आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या दिशेने निघालेले चक्रीवादळ वायव्येला सरकल्याने अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्विपमधील हवामान बदललं आहे. उत्तर महाराष्ट्रात वाऱयाचा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र, गोवा येथील किनारपट्टीवर वादळी हवामान निर्माण होऊन ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
तर दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. द्राक्ष, कांदा, आंबा संकटात आहे. अवकाळीचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. दरम्यान, उद्यापासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तविली आहे. आज उत्तर कोकण आणि उत्तर मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, उद्यापासून महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. येत्या पाच दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा, कुलाबा वेधशाळेने वर्तवला अंदाज आहे.