New Vande Bharat Express in Maharashtra: भारतामधील अनेक शहरं वंदे भारतने जोडली जात आहेत. असं असतानाच मध्य रेल्वेच्या मार्गावरही 2 नव्या वंदे भारत दाखल होणार आहेत. मुंबई ते कोल्हापूर मार्गावर वंदे भारत सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे पुण्यावरुन वडोदऱ्याला जाणारी वंदे भारतही सुरु होणार आहे.
प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या मार्गावर 2 नव्या वंदे भारत सुरु केल्या जाणार असल्याची घोषणा रेल्वेने केली आहे. मुंबई-सोलापूर, मुंबई-शिर्डी यासारख्या मार्गांवर वंदे भारत सुरु केल्यापासूनच मुंबईहून कोल्हापूर मार्गावर वंदे भारत सुरु करावी अशी मागणी केली जात होती. प्रवाशांकडून होणारी वाढती मागणी लक्षात घेत मुंबई-कोल्हापूर वंदे भारत सुरु केली जाणार आहे. त्याचप्रमाणे पुणे ते वडोदरा मार्गावर वंदे भारत चालवली जाणार आहे. शिर्डी, सोलापूरच्या माध्यमातून तुळजापूर, अक्कलकोटसारखी देवस्थांना वंदे भारतच्या माध्यमातून वेगवान कनेक्टीव्हिटी मिळाल्यानंतर आता कोल्हापूरचाही यामध्ये समावेश होणार असल्याने ही सेवा भाविकांसाठी फार फायद्याची ठरणार आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातदरम्यान बुलेट ट्रेन आधी सर्वात जलद ट्रेन म्हणून पुणे-वडोदरा मार्गावर वंदे भारत चालवली जाणार आहे. पुणे- वडोदरा वंदे भारत एक्सप्रेस ही वसई रोड मार्गे धावेल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांच्या सुत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र हा सर्वाधिक वंदे भारत धावणाऱ्या ट्रेन्सच्या यादीतील राज्य आहे. महाराष्ट्रात एकूण 6 वंदे भारत ट्रेन धावतात. आता ही संख्या वाढून 8 इतकी होणार आहे. सध्या मुंबईमधून मुंबई सेंट्रल ते गुजरातमधील गांधीनगर, सीएसएमटी ते गोव्यातील मडगाव, सीएसएमटी ते शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर मार्गाबरोबरच सीएसएमटी ते जालना मार्गावर वंदे भारत ट्रेन्स धावतात. तसेच मध्य प्रदेशमधील बिलासपूर ते नागपूरदरम्यानही वंदे भारत ट्रेन धावते.
बिहारमध्येही दोन नव्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवल्याजाणार आहेत. या दोन्ही ट्रेन राजधानीचे शहर पाटणा येथून धावणार आहेत. एक ट्रेन पाटणा ते लखऊ
मार्गावर व्हाया अयोध्या धावणार आहे. दुसरी ट्रेन ही पाटण्याहून पश्चिम बंगालच्या सिलीगुडी शहरातील न्यू जलपायगुडी जंक्शनदरम्यान धावणार आहे. पाटना ते लखनऊदरम्यान अयोध्या मार्गे धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची पाटणा जंक्शन ते लखनऊदरम्यानची ट्रायल रन पूर्ण झाली आहे. ही ट्रेन सुरु झाल्याने रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाण्यासाठी एक जलद माध्यम उपलब्ध होणार आहे.