...तर बारामतीतून सुनेत्रा पवारच आमच्या उमेदवार; सुनील तटकरेंनी थेट जाहीर केलं

Supriya Sule Vs Sunetra Pawar: बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. सुनील तटकरे यांनी थेट सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 6, 2024, 08:54 AM IST
...तर बारामतीतून सुनेत्रा पवारच आमच्या उमेदवार; सुनील तटकरेंनी थेट जाहीर केलं title=
NCP sunil tatkare says Sunetra Pawar to contest from Baramati for loksabha 2024

Loksabha Election 2024:  राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अद्याप उमेदवार जरी जाहीर झाले नसले तरीही संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यात सध्या चर्चा सुरू आहे ती बारामती मतदारसंघाची. बारामतीत नणंद विरुद्ध भावजय यांच्यात लढत होणार अशा चर्चा असतानाच सुप्रिया सुळे यांचे प्रचाररथ सुरू झाले आहेत. तर, एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचीही उमेदवारी पक्की समजली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. (Supriya Sule Vs Sunetra Pawar)

बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणार असल्याच चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत. आता या चर्चेवर सुनील तटकरे यांनीही एकाअर्थी शिक्कामोर्तबच केलं आहे. सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच निवडणूक लढवणार, अशी घोषणा त्यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या टप्प्याच्या आढावा बैठकीनंतर सुनील तटकरेंनी ही घोषणा केली आहे. 

गेल्या 40 वर्षात अजित पवार यांनी बारामतीच्या विकासासाठी योगदान दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात त्याचे परिणाम दिसून येतील, असंही तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत नणंद-भावजय यांच्यात लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. 

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आढावा बैठक घेण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या जागेच्या संदर्भात त्या-त्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार,कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल,प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,जेष्ठ मंत्री छगन भुजबळ,मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित होते. मंगळवारी नाशिक, दिंडोरी, ईशान्य मुंबई, गोंदिया भंडारा, हिंगोली, धाराशिव, रायगड या लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला तर, आज बुधवारी कोल्हापूर, बुलढाणा, माढा सातारा, शिरूर, बारामती, परभणी अहमदनगर,गडचिरोली या लोकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यात येणार आहे. 

सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू

दरम्यान, बारामतीतून सुनेत्रा पवार निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा असतानाच सुप्रिया सुळेदेखील आता अॅक्टिव्ह झाल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी बारामतीत प्रचाराची सुरुवात केली असून सध्या त्या मतदारसंघ पिंजून काढत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांचे उमेदवार आणि चिन्ह असलेले प्रचार रथ आता बारामती लोकसभा मतदारसंघात फिरू लागलेत. तसेच प्रचाराचे ठिकठिकाणी बॅनर लागले आहेत.