Mahaparinirvan Din 2023: 6 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागणी

Mahaparinirvan Din 2023: 6 डिसेंबरला मुंबई-ठाण्यात सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पंत्र देखील लिहीले आहे. 

Updated: Dec 5, 2023, 04:53 PM IST
Mahaparinirvan Din 2023: 6 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा; महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागणी title=

Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din:  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात.  प्रचंड भीमसागरासाठी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी एक खास मागणी केली आहे. या दिवशी सर्वांनाच चैत्यभूमीवर अभिवादन करणं शक्य व्हावं, यासाठी मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुटी जाहीर करा, अशी मागणी करणारं पत्र प्रा. वर्षा गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे.

बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य जातिवाद दूर करण्यासाठी आणि गरीब, दलित व मागासवर्गीयांच्या विकासासाठी समर्पित केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत असतात. मात्र, या दिवशी सर्व कार्यालये सुरू असल्याने अनेक अनुयायींना महामानवास अभिवादन करणे शक्य होत नाही. राज्यातील अनेक संघटना याच पार्श्वभूमीवर बऱ्याच वर्षांपासून सुटी मिळावी, अशी मागणी करत आहेत. त्यातच 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी समन्वय समितीने मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबतची शिफारस शासनाला केली आहे, अशी माहिती प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

सध्या सभोवतालचं सामाजिक वातावरण फार संभ्रमात्मक दिसत आहे. अनेक ठिकाणी जातीय तेढ निर्माण होत आहे. प्रत्येक ठिकाणी एकमेकांचे वाभाडे काढले जात आहेत. अशा वेळी बाबासाहेबांचे समता व बंधुता हे विचार जनसामान्यांमध्ये रूजणे फार गरजेचं आहे. त्यासाठीच या दिवशी म्हणजेच बाबासाहेबांच्या ६७व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, नवी मुंबई या परिसरात सुटी जाहीर करावी, अशी मागणी करणारं पत्र प्रा. वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.

बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना कोणतीही अडचण येणार नाही - मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महापरिनिर्वाण दिनासाठी आंबेडकर अनुयायी मुंबईत दाखल झालेत. दादर चैत्यभूमी या ठिकाणी लाखोंच्या संख्येत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी त्याचे अनुयायी येत असतात. यावर्षी 2 दिवस आधीच अनुयायी या ठिकाणी पोहचलेत. मुंबई महापालिकेने शिवाजी पार्कमध्ये मोठे शामियाने लावलेत.  

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत चैत्यभूमी कमिटी आणि प्रशासनाची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चैत्यभूमी परिसराचा आढावा घेतला. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना कोणतीही अडचण येणार नाही, सर्व सुविधांचा पुरवठा केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.