शिवसेनेची सत्ता स्थापन न झाल्याने नाराज शिवसैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुख्यमंत्री न झाल्याने आणि शिवसेनेचे सरकार राज्यात स्थापन न झाल्याने आपण हे पाऊल उचलले असल्याचे त्याचे म्हणणे आहे. 

Updated: Nov 25, 2019, 03:18 PM IST
शिवसेनेची सत्ता स्थापन न झाल्याने नाराज शिवसैनिकाचा आत्महत्येचा प्रयत्न title=

जयेश जगड, झी मीडिया, वाशिम : शिवसेनेचे सरकार स्थापन होण्यास काही काळ राहिला असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्याने भाजपाने सरकार स्थापन झाले. यामुळे निराश झालेल्या एका शिवसैनिकाने स्वतःस ब्लेड मारून जखमी केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील मानोरा चौकात घडली. सदर इसम स्वतःस शिवसैनिक सांगत असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न झाल्याने आणि शिवसेनेचे सरकार राज्यात स्थापन न झाल्याने आपण हे पाऊल उचलले असल्याचे त्याचे म्हणणे आहे. 

भाजपने रातोरात सुत्र हलवून देवेंद्र फडणवीस यांनी अजि पवारांच्या मदतीने शपधविधी सोहळा पार पडला. तिथल्या उपस्थितांव्यतिरिक्त कोणालाही याची कानोकान खबर नव्हती. एक खासगी वृत्तसंस्था वगळता कोणत्याही प्रसिद्धी माध्यमांना या शपथविधीचे आमंत्रण नव्हते. शिवसेनेसाठी हा सर्वात मोठा धक्का होता. मुख्यमंत्री पद आणि समान जागा वाटपावर अडून राहिलेल्या शिवसेनेने भाजपाला शह देण्यासाठी पारंपारिक शत्रू असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. आता शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पूर्ण होणार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार याच बातम्या दैनिकातही छापून आल्या होत्या. शिवसैनिकही हीच गोड आठवण घेऊन आदल्या रात्री झोपी गेले होते. पण सकाळी पूर्ण चित्र बदलले होते. शिवसैनिकांसाठी ही धक्क्यातून सावरणे कठीण होते.

रमेश बाळू जाधव असे या इसमाचा नाव असून हा वाशीम जिल्ह्यातील उमरी खुर्द येथील रहिवाशी आहेय. काही कामानिमित्त रमेश हा दिग्रस येथे आला असतांना राज्यात शिवसेने ऐवजी भाजपाचे सरकार स्थापन झाल्याची ब्रेकिंग बातमी त्याला कळाली आणि या घटनेचा धक्का सहन न झाल्याने त्याने तात्काळ दिग्रस मानोरा चौकात स्वतःवर ब्लेडने वार करावयास सुरुवात केली.

हा प्रकार तेथे चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतुक हवालदार युवराज चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर व्यक्तीस ताब्यात घेतले व ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या या इसमाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.