'प्रेमदिनी' रंगली आगळी-वेगळी वृक्षसुंदरी स्पर्धा

नक्की काय आहे ही वृक्षसुंदरी स्पर्धा, एकदा पाहाच...

Updated: Feb 14, 2020, 08:30 PM IST
'प्रेमदिनी' रंगली आगळी-वेगळी वृक्षसुंदरी स्पर्धा

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमध्ये आयोजित वृक्ष संमेलनात आज चक्क वृक्ष सुंदरींची निवड करण्यात आली. एवढंच नव्हे तर दरवर्षी १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाइन डे यापुढे वृक्षसुंदरी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. बीडमध्ये वृक्ष सुंदरी स्पर्धा आयोजित करण्यात आली.

व्हॅलेंटाइन्स डेच्या मुहूर्तावर बीडमधील वृक्ष संमेलनात ही आगळी वृक्षसुंदरी स्पर्धा रंगली. केवळ सौंदर्य पाहून नव्हे, तर तरुणींची निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी, त्यांचं झाडं, वेली, पशू, पक्षी यांच्याबद्दलचं ज्ञान तपासून ३ वृक्षसुंदरींची निवड करण्यात आली. 

विशेष म्हणजे विजेत्या वृक्षसुंदरींना ताडोबा व्याघ्र सफारी आणि पेंच जंगलाची पर्यटन ट्रीप बक्षीस मिळाली. झाडं लावा आणि झाडांवर प्रेम करा, असा संदेश या वृक्ष सुंदरींनी यानिमित्ताने दिला.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यात सह्याद्री देवराई इथे हे पहिलं वृक्ष संमेलन संपन्न झालं. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आजारी गरुड पक्ष्यावर उपचार करुन त्याला आकाशात सोडण्यात आलं. या वृक्ष संमेलनाला हजारो पर्यावरण प्रेमी, पक्षी मित्रांनी हजेरी लावली.

यापुढं दरवर्षी वृक्ष संमेलन आणि त्यामध्ये वृक्ष सुंदरी स्पर्धा भरवण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. तरुणाईला निसर्गावर प्रेम करायला लावण्याचा हा उपक्रम स्तुत्यच म्हणावा लागेल.