HMPV Virus: चीनमधील नवीन व्हायरसचा भारतात शिरकाव झालाय... यामुळे नागरिक भयभीत झालेत. या व्हायरसमुळे पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती येईल का, या विचाराने आपण सगळेच धास्तावलोय...त्यामुळे परत लॉकडाऊन लागेल का, या आजारामुळे घरी बसावं लागेल का, या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात. कोरोनाचा भाऊ म्हणून ओळख असलेल्या एचएमपीव्ही आजारानं भारतात वर्दी दिलीये. चीनमध्ये उद्रेक झालेल्या एचएमपीव्ही आजाराच्या विषाणूनं भारतात एंट्री झाल्यानंतर भारतीयांच्या कोरोनाच्या आठवणी ताज्या झाल्यात. कोरोनासारखाच आजार वेगानं पसरत असल्यानं सामान्यांमध्ये आजाराबाबत प्रचंड भीती पाहायला मिळते. अनेकांनी पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशी शंका व्यक्त केलीय. कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊनमुळं अनेकांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागलं. त्यामुळं लॉकडाऊनचं नाव घेताच अनेकांच्या अंगावर काटा आलाय.
लॉकडाऊन लागू नये यासाठी आतापासूनच मास्क वापरण्य़ाची मागणी होतेय. सरकारनं लॉकडाऊन टाळण्यासाठी आतापासूनच कठोर उपाययोजना करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत.लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना बसला होता. परत लॉकडाऊन आल्यास ट्रॅव्हल्स सेक्टर देशोधडीला लागेल अशी भीती व्यक्त करण्यात येतेयं. तज्ज्ञांनी मात्र एचएमपीव्ही आजार लॉकडाऊन करण्याऐवढा गंभीर नसल्याचं सांगितलंय. आजाराबाबत काही खबरदारी घेतल्यास लॉकडाऊनची वेळ येणारच नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आजाराला घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलंय. कोरोनासारखा आजार पुन्हा येणार नाही याची शाश्वती आरोग्यतज्ज्ञांनी दिली नव्हती. पण कोरानासारखाच वेगानं पसरणारा आजार पुन्हा आलाय. हा आजार गंभीर नसला तरी लॉकडाऊन लावण्याची वेळ आल्यास काय होईल या कल्पनेनंच अनेकांच्या पोटात गोळा आलाय.
HMPV आजार कोरोनासारखा असल्यानं सगळेच सावध झालेत. एचएमव्हीपी आजार वाऱ्याच्या वेगानं भारतात दाखल झालाय. चीनमध्ये उद्रेक झाल्यानंतर अवघ्या 48 तासांत या आजाराचे रुग्ण भारतात सापडलेत. त्यामुळं या आजाराचं गांभीर्य वाढलंय. एचएमपीव्ही आजारामुळं जगभरात खळबळ माजलीय. कोरोनाच्या तडाख्यातून जग सावरत असतानाच नव्या विषाणूजन्य आजारानं एंट्री केलीय. एचएमपीव्हीबाबत लोकांच्या मनात शंभर प्रश्न निर्माण झालेत. एचएमव्हीपीपासून आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी काय काय करावं यापासून या आजाराबाबत अनेक प्रश्न विचारले जाऊ लागलेत. हा आजार कोरोनासारखाच आहे.कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनाही या आजाराचा धोका आहे. पण कोरोनाएवढा हा आजार घातक नाही. HMPVचा धोका लहान मुलं आणि व्याधीग्रस्तांना आहे. एचएमपीव्ही आजाराची लागण होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश तज्ज्ञांनी दिलेत.
शिंकताना, खोकताना रुमालाचा वापर करा. हात वारंवार धुवावेत. पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. ताप, खोकला असताना सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करा. सर्दी, खोकला झाल्यास स्वत:च्या मनाने औषध घेऊ नका. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नका. लहान मुलं, वृद्धांनी विशेष काळजी घ्या. एचएमव्हीपी आजाराला घाबरण्यापेक्षा काळजी घ्या, काळजी करु नका असं तज्ज्ञ सांगतात. कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनी बिनधास्तपणे वागू नये असंही तज्ञ सांगतात. एचएमव्हीपी आजार गंभीर नसला तरी त्याला कोरोनाप्रमाणं गांभीर्यानं घ्यायला हवं.अन्यथा त्याची मोठी किंमत मोजावी लागण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळं सावधगिरी हेच मोठं औषध असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय.