विशाल करोळे, झी २४ तास औरंगाबाद : औरंगाबादमधील वामन हरि पेठे ज्वेलर्समधून मॅनेजर आणि त्याच्या साथीदारांनी तब्बल ६५ किलो सोनं लांबवलंय. चोरलेल्या सोन्यातून आरोपींनी २ बंगले आणि महागड्या कार खरेदी केल्याचीही माहिती समोर आलीय. औरंगाबादच्या वामन हरी पेठे ज्वेलर्समधून मॅनेजर अंकुर राणे, राजेंद्र आणि लोकेश जैन यांनी तब्बल ६५ किलो सोनं लांबवल्याची नवी माहिती समोर आलीय.
आरोपींनी वामन हरी पेठे ज्वेलर्समधून चोरलेलं सोन्यापैकी २० किलो सोनं एका वित्तीय संस्थेत गहाण ठेवलं. त्यातून आलेल्या पैशातून समर्थनगर या उच्चभ्रू वस्तीत दोन बंगले घेतले. शिवाय दोन कारही विकत घेतल्या. आरोपी राजेंद्र आणि लोकेश जैन यांचं राहणीमान एखाद्या गर्भश्रीमंताला लाजवणारं होतं. औरंगाबादेतल्या उच्चभ्रू लोकांमध्ये त्यांनी उठबस होती.
पोलिसांनी आतापर्यंत २० किलो सोनं जप्त केलंय. पण उर्वरित सोनं कुठं आहे? आरोपींनी ते सोनं कुणाला विकलं? याची पोलीस माहिती काढत आहेत.