Crime News : बोगस प्रमाणपत्राच्या आधारे `13 वर्षे शिक्षकेची नोकरी; शेवटी असं फुटलं बिंग

Crime News : याप्रकरणी शिक्षिकेसह इतर दोघांवर वाशिम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 13 वर्षानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याने वाशिमसह यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Updated: Feb 18, 2023, 06:54 PM IST
Crime News : बोगस प्रमाणपत्राच्या आधारे `13 वर्षे शिक्षकेची नोकरी; शेवटी असं फुटलं बिंग title=

गणेश मोहळे, झी मीडिया, वाशिम : वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी दाखवून यवतमाळच्या पांढरकवडा नगरपरिषद शाळेत बोगस दिव्याग प्रमाणपत्राच्या आधारे शिक्षिकेची नोकरी लाटण्याचा धक्कादायक प्रकार तब्बल 13 वर्षानंतर समोर आला आहे. याप्रकरणी शिक्षिकेसह इतर दोघांवर वाशिम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 13 वर्षानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आल्याने वाशिमसह यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

2009 मध्ये ऑफलाइन दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सोनल गावंडे या शिक्षिकेने बनावट आधार कार्ड तयार करून वाशिम जिल्ह्याचा पत्ता टाकला होता. त्या आधारावर वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातून खोटे दिव्यांग प्रमाणपत्र मिळविले. मात्र एका तक्रारीनंतर 13 वर्षांनी या शिक्षिकेचं बिंग फुटलं आहे. 

बोगस दिव्यांग प्रमाण पत्र बनवून यवतमाळच्या वडगाव मधील सोनल प्रकाश गावंडे यांनी शिक्षिकेची नोकरी केली. गावंडे यांनी 2009 मध्ये दिव्यांगाचा लाभ घेण्यासाठी खोटे कागदपत्र तयार करून पांढरकवडा नगरपरिषदेच्या शाळेमध्ये नोकरी मिळविली होती. यासाठी त्यांना यवतमाळ नगरपरिषद शिक्षण विभागातील कर्मचारी अतुल वानखडे आणि पांढर कवडा शहरातील राजश्री शाहू महाराज प्राथमिक शाळेचे शिक्षक नहूष दरवेशवार यांनी मदत केली होती. त्यानंतर हा गंभीर प्रकार नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवरा बुद्रुकचे उपसरपंच मयूर मेश्राम यांच्या तक्रारीनंतर उघड झाला.

शिक्षण विभागानं मयूर मेश्राम यांच्या तक्रारीची दखल घेऊन फेरपडताळणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 2 सप्टेंबर 2022 रोजी सोनल गावंडे यांनी दिव्यांग युडीआयडी ऑनलाइन अर्ज दाखल केला. त्यासोबत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र व बोगस आधार कार्ड तसेच वाशिम जिल्ह्यातील रहिवासी दाखले जोडले असल्याचे समोर आले होते. रुग्णालयामार्फत या प्रमाणपत्रांची पडताळणी केली असता सर्व कागदपत्र खोटे असल्याचं आढळून आलं.  वाशिम जिल्हा रुग्णालयाने याची माहिती वाशिम शहर पोलिस स्टेशनला दिल्या नंतर पोलिसांनी शिक्षिकेसह तिघांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"तक्रारीनुसार सोनल गावंडे यांनी अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यासोबत त्यांनी जुने प्रमाणापत्र जोडले होते. जुने प्रमाणपत्र हे आमच्याकडून जारी करण्यात आले नव्हते. या आधारे आम्ही प्रमाणपत्राबाबत पोलिसांत ते बोगस असल्याची तक्रार दिली. हे प्रमाणपत्र रुग्णालयातून देण्यात आले नव्हते," अशी माहिती वाशिमचे जिल्हा शल्य चिकित्सक विजय काळबांडे यांनी दिली आहे.