चेतन कोळस झी मीडिया येवला : पुरेसा पाऊस झाला असला तरी येवल्यात पाणीटंचाईची समस्या कायमच राहीलीये.
गेल्या दोन महिन्यांपासून येवल्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्यात. जिल्हाधिकारी पाण्याच्या टँकरचा प्रस्ताव मंजूर करत नसल्यानं ग्रामनिधीच्या रकमेतून गावकऱ्यांना पाण्याची सोय करावी लागतीये.
नाशीक जिल्ह्यातला दुष्काळी तालुका म्हणजे येवला.अनियमीत पावसामुळे या जिल्ह्यात यंदा डिसेंबरपासूनच पाणीटंचाई निर्माण झालीये.
कुसमाडी, आहेरवाडी, गोपाळवाडी, खैरगव्हाण या गावातल्या विहिरींनीतर ऑक्टोबर महिन्यातच तळ गाठलाय.. गावकरी पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी करताहेत..
मात्र जिल्हाधिका-यांकडून प्रस्तावाला मंजूरी नाही. त्यामुळे स्वखर्चानं टँकर मागवून इथले गावकरी तहान भागवताहेत.
वारंवार तक्रारी करुन प्रशासन दखल घेत नसल्यानं या गावक-यांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली. तक्रार येताच झी हेल्पलाईनची टीम येवल्यात दाखल झाली.. गावातील पाणीटंचाईची पहाणी केली..त्यानंतर ग्रामस्थांना सोबत घेऊन पंचायत समितीचं कार्यालय गाठलं.
गटविकास अधिका-यांची भेट घेतली.. गावातील पाणीटंचाईचं चित्रीकरण त्यांना दाखवलं. त्यांनीही गावक-याचं म्हणणं ऐकून घेतलं..
गावाचे प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठवल्याचं ते म्हणाले.. जिल्हाधिका-यांनी प्रस्तावाला मंजूरी न मिळाल्यानं टँकर देता येत नसल्याची कबुली त्यांनी दिली. गावक-यांच्या सोईसाठी ग्रामनिधीतून पाणी पुरवठा करण्याचं आश्वास त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं..
गटविकास अधिका-यांनी ग्रामनिधीतून पाणीटंचाईवर तात्पुरता तोडगा काढलाय.
मात्र उन्हाळ्याचा विचार करता लवकरच यावर कायमस्वरुपी तोडगा काढणं गरजेचं आहे.. आणि त्यासाठी झी हेल्पलाईन जिल्हास्तरापर्यंत याचा पाठपुरावा करतच राहणार आहे.