Gulabrao Patil : शिंदे गटाचे आमदार तथा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना न्यायालयाने दंड ठोठावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर पाच कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. या प्रकरणी कोर्टात गैरहजर राहिल्याने जिल्हा न्यायालयाने गुलाबराव पाटील यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. भाषणादरम्यान बदनामी केल्याचा आरोप खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद जळगाव जिल्ह्यात नाही तर राज्यात चर्चेत असतो. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जातात. एकनाथ खडसे यांनी एका प्रकरणात गुलाबराव पाटील यांच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्या प्रकरणात जळगाव जिल्हा न्यायालयाने गुलाबराव पाटील यांना 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या खटल्यात सुनावणी जळगाव जिल्हा न्यायालयात सुरु आहे. पहिल्याच दिवशी मंत्री गुलाबराव पाटील गैरहजर होते. गुलाबराव पाटील यांनी आपल्या वकिलामार्फत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून अर्ज दाखल केला होता.
कोर्टाने 500 रुपयांचा दंड करत गुलाबरावांचा अर्ज मंजूर केला. तसेच रजेचा अर्ज मंजूर करताना, उद्याचा सुनावणीचा दिवस सोडून पुढची तारीख मिळणार नाही, अशी तंबीही दिली. अशी माहिती एकनाथ खडसे यांचे वकील भूषण देव यांनी दिली.
गुलाबराव पाटलांविरोधात मनसे आक्रमक
जळगावात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. जळगाव तालुक्यातील मन्यारखेड्याचे ग्रामस्थ 12 वर्षांपासून तीव्र पाणी टंचाईचा समना करत आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेनं रास्तारोको केला होता.