विदर्भ खानदेशात उष्णतेनं नागरिक हैराण; तर पश्चिम महाराष्ट्र कोकणात गारपीट

Weather report | राज्यात उष्णतेमुळे नागरीकांची लाही लाही होत आहे. परंतू पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे.

Updated: Apr 7, 2022, 08:29 AM IST
विदर्भ खानदेशात उष्णतेनं नागरिक हैराण; तर पश्चिम महाराष्ट्र कोकणात गारपीट  title=

मुंबई : राज्यात आणखी एक उष्णतेची लाटेच्या इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तरेकडील उष्ण वा-यांचा राज्यावर गंभीर परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. परंतू कोकण, पश्चिम महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा बसला आहे. रत्नागिरी, सांगली, कोल्हापुरात गारपिटीमुळे पीकांचं नुकसान झालं आहे. 

काल सांगली जिल्ह्यात जोरदार गारपीट झाली. मिरज शहरात वादळी वा-यांसह गारांचा पाऊस पडला. यामुळे शहरात गारांचा खच बघायला मिळाला. सलग तिस-या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. यामुळे द्राक्ष पीक धोक्यात आलं असून शेतकरी चिंतेत आहेत. या अवकाळीचा गहू, हरभरासह, कलिंगड, आंब्यालाही फटका बसला आहे. पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. तर अनेक घरांवरील पत्रेही उडून गेले आहेत

कोल्हापूरातही नुकसान

पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जोरदार गारपीट झालीय. तर कोल्हापूर शहरातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गारपिटीमुळे शेतक-यांना मोठा फटका बसलाय.

कोकणालाही तडाखा

पश्चिम महाराष्ट्रासोबत कोकणातही अवकाळी पाऊस झालाय. अवकाळी पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील अनेक गावांना झोडपपालू गावात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे अनेक घराचे पत्रे उडाले. सोसाट्याचा वारा आणि कडकडाटसह पावसाने पालू गावाला झोडपलं. अचानक आलेल्या पावसाने आंबा आणि काजू व्यावसायिक हैराण झालेत.  

उष्णतेच्या लाटेचाही इशारा

राज्यात पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हा इशारा दिलाय. पश्चिम राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशातल्या उष्ण तापमानाचा राज्यावर परिणाम होत आहे. राज्यात बुधवारी बहुतांश भागात 40 अंशांच्या पुढे तापमान होतं. अकोल्यात पारा 44 अंशांच्या पुढेच आहे.

दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे असा अहवाल सरकारी आयआयटीएम संस्थेने दिलाय.