पुणे : महाराष्ट्र बंदला कोल्हापूरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. गावागावातील दूध संकलन बंद करण्यात आलं. मार्केट समित्याही ओस पडल्या होत्या.
2) एकीकडे संप आणि बंदच्या नावाखाली रस्त्यावर शेकडो लिटर दूध ओतून दिलं जातंय. तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये मात्र शेतक-यांनी चांगलं काम केलंय. निगवे गावातल्या शेतक-यांनी गरीब आणि गरजूंना मोफत दूधाचं वाटप केलं.
3) आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेनाही रस्त्यावर उतरली. शेतक-याचा सातबारा कोरा करा यासाठी शिवसेना आक्रमक झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकानी पुणे-बंगळुरू हा NH 4 रोखला.
4) कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव इथं शेतक-यांनी शेतमाल रस्त्यावर ओतून आंदोलन केलं. शेतीमालाला भाव मिळत नाही तर त्याचं करायचं काय, असा प्रश्न शेतक-यांनी उपस्थित केलाय.
5) कोल्हापुरातल्या पेठ वडगावच्या जनावरांचा बाजार सुरू ठेवण्या-या व्यापा-यांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आणि जबरदस्तीनं जनावरांसह परत पाठवलं.
तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या कार्यालयालाही टाळं ठोकलं.
6) सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. या आंदोलनामुळे कोट्यवधी रुपयाची उलाढाल ठप्प झाली. तिसंगी गावात रस्त्यावर टायर पेटवले. तर साखराळे आणि बावची गाव बंद ठेवत गावातील दूध गावातच मोफत वाटण्यात आलं. सांगलीत पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही सर्वपक्षीय आंदोलकांनी सांगलीत रॅली काढली आणि दुकानं केली बंद आहेत.
7) सातारा जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे १३ कृषी उत्पन्न समित्या बंद होत्या. साता-याहून पुण्याकडे जाणारा भाजीपाला शेतक-यांनी रोखला. दुधाच्या टँकरवर दगडफेकही करण्यात आली.
8) पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्येही कडकडीत बंद ठेवण्यात आला. निमगाव केतकीतल्या ग्रामस्थांनी गावात फेरी काढली आणि सगळे व्यवहार बंद ठेवले
9) पुणे जिल्ह्यातील शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यात सर्वच ठिकाणी कडकडीत बंद पाळला गेला. संतप्त शेतक-यांनी नारायणगाव शिरूर मार्गावर पंचतळे इथं एसटी महामंडळाच्या बस सर्व वाहने अडवून धरल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला होता. संतप्त शेतक-यांनी आपल्या बैलांना रस्त्यावर उतरवून दूध ओतलं.
10) दौंड तालुक्यातूनही बंदला मोठा पाठिंबा मिळत असून शेतकऱ्यांसह व्यापा-यांनीही आपली दुकाने बंद ठेवली. दौंड तालुक्यातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या केडगाव इथंही कडकडीत बंद ठेवण्यात आला असून कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत दुकानेही बंद असल्याचे पाहायला मिळालं. या बंदमध्ये केडगावसह वरवंड, पाटस, राहू, यवत ही मोठी गावेही सामील झाली आहेत.
11) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. बंददरम्यान बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांनी सोलापूर हैद्राबाद हायवेवर चक्का जाम आंदोलन केलं. जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, अकलूज, करमाळासह १४ बाजार समिती बंद होत्या. माढा आणि कुरडवाडीत शेतक-यांनी सरकारविरोधात निषेध नोंदवला.