मुंबईलगतच्या या शहरात शंभर टक्के दारूबंदी; 19 वर्षांपूर्वी ग्रामस्थानी घेतला होता निर्णय

Kharghar Liquor Free Zone: मुंबई लगतच्या या एका शहरात शंभर टक्के दारुबंदी आहे. कित्येक वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 2, 2024, 05:25 PM IST
मुंबईलगतच्या या शहरात शंभर टक्के दारूबंदी; 19 वर्षांपूर्वी ग्रामस्थानी घेतला होता निर्णय title=
What is the reason that the Kharghar node in Navi Mumbai is Dry Zone

Kharghar Liquor Free Zone: मुंबई लगतच्या या एका शहरात दारूविक्री बंद आहे, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले ना. पण हे खरं आहे. नवी मुंबईतील खारघर शहर हे असं एकमेव शहर आहे इथे शंभर टक्के दारुविक्री बंद आहे. गावकऱ्यांनी संघर्ष करत व लढा देत इथे दारुबंदी करुन दाखवली आहे. आज खारघर शहरात लोकवस्ती व आधुनिक सुविधा वाढत आहेत. खरघर एक अत्याधुनिक शहर म्हणून नावारुपाला येत आहे. तरीही या शहरात एकही वाइनशॉप किंवा बार दिसणार नाही. यामागे गावकऱ्यांच्या संघर्षाची कथा आहे. 

खारघरमध्ये एकही वाइन शॉप किंवा बार नाहीये. इतकंच काय तर मोठ्या मोठ्या हॉटेलमध्येही दारू मिळत नाही. हे सर्व शक्य झाले ते गावकऱ्यांच्या लढ्यामुळं. सुरुवातीला खारघरमध्ये दोन बार होते मात्र, तेही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं बंद झाले. त्यामुळं आता खारघरमध्ये शंभरटक्के दारुविक्री बंद आहे. 

2002 च्या आधी खारघरमध्ये ग्रामपंचायत होती. त्यावेळी या ग्रामपंचायतीत व परिसरातील इतर गावे ओवे, कोपरा, बेलपाडा, मुर्बी या गावात दारूची दुकाने नव्हती. हळहळू लोकवस्ती वाढू लागली. त्यानंतर खारघर ग्रामपंचायतीने 2005 साली संपूर्ण खारघर गाव आणि कॉलनीमध्ये दारुबंदी करण्यात यावी असा ठराव पारित केला होता. या ठरावाच्या आधारे आजही शहरात दारूबंदी आहे. 

2016 साली पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली. त्यापूर्वी पनवेलमध्ये नगरपरिषदच होती. त्यानंतर 29 ग्रामपंचायतीचा पनवेल महानगरपालिकेत समावेश करण्यात आला. यात खारघर ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. अनेकदा खारघरमध्ये दारुविक्रीचा परवाना देत दारुची दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र, ग्रामस्थांनी त्याविरोधात लढा देत ही दुकानेही बंद केली. 

दरम्यान, अनेकदा खारघरमध्ये दारुविक्री सुरू करण्यात यावी म्हणून प्रयत्न केले गेले. दारुबंदीसाठी येथे मतदान प्रक्रिया राबवली जाते. महापालिकेला खारघरमध्ये दारुबंदी करायची झाल्यास त्या प्रभागात उभी बाटली आणि आडवी बाटली अशा पद्धतीने हे मतदान प्रक्रिया राबवली जाते. 50 टक्क्यांपेक्षा मते आडवी बाटलीच्या बाजूने असेल तर दारुमुक्त म्हणून घोषित केले जाते. 

गेल्या काही वर्षात खारघरची लोकसंख्या व अधुनिकीकरण झालं आहे. खारघर एक शहर म्हणून नावारुपाला आलं आहे. असे असतानाही या शहरातील नागरिकांनी व गावकऱ्यांनी दारुबंदीचा हा लढा यशस्वी करुन दाखवला आहे.