वर्धा : वर्ध्याची ओळख असलेली दारूबंदी आजवर कधीच पूर्णतः यशस्वी होऊ शकली नाही. उपाय अनेक झाले पण या उपायांची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच या उपायांवर पडदा टाकत आल्याचे समोर आले आहे. दारू बंदी महिला मंडळ, ग्राम सुरक्षा दल, गुप्तचर यंत्रणा यांसारखे उपाय सध्या कापडात गुंडाळलेय की काय असाच प्रश्न निर्माण झाला आहे. दारूबंदी असली तरीही जिल्ह्यात दारू येण्याचे मार्ग अनेक आहेत.
जिल्ह्याच्या चारही सीमेवरून ही दारू सीमोल्लंघन करीत वर्धेकरांपर्यंत पोहोचत आहे. मग ती देशी असो अथवा विदेशी. दारूसाठी मद्यप्रेमी पैसे मोजायला तयार असतात. पण पोलीस यंत्रणा सज्ज असून देखील ही दारू गावात शिरकाव करते कशी? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
कितीही प्रयत्न केले तरीही दारूबंदी यशस्वी झाली नाही म्हणूनच पुढे दारूबंदी महिला मंडळाचा उगम झालाय. महिला दारूविक्री थांबवा अशी मागणी करीत पोलिसांपर्यंत पोहोचल्या तरी प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
दारूबंदी रोखण्यासाठी शासनाने दुसरे पाऊल उचलले ते म्हणजे ग्राम सुरक्षा दलाचे. गावात पोहोचणाऱ्या दारूला आळा घालण्यासाठी आणि उत्पादन तसेच विक्री रोखण्यासाठी ग्राम सुरक्षा दलाने भूमिका बजावावी यासाठी शासन निर्णय काढण्यात आलाय.
शासन निर्णयातील अंमलबाजवणी मात्र कागदावरच राहिलीय. जिल्ह्यात असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.