अजित पवारांनी का केलं होतं बंड? चेकमेट पुस्तकातून धक्कादायक खुलासा

अजित पवारांनी का केली होती भाजप सोबत हात मिळवणी?

शैलेश मुसळे | Updated: May 21, 2020, 04:50 PM IST
अजित पवारांनी का केलं होतं बंड? चेकमेट पुस्तकातून धक्कादायक खुलासा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात युतीला बहुमत मिळालं होतं. पण मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेतील युती तुटली आणि महाविकासआघाडी जन्माला आली. पण या दरम्यान महाराष्ट्राने मोठा सत्तासंघर्ष पाहिला. राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येऊन 6 महिने होत आले आहेत पण अनेकांच्या मनात एक प्रश्न अजूनही घर करुन आहे की, अजित पवारांनी त्यावेळी बंड करुन भाजपसोबत सत्ता का स्थापन केली होती. 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक दिवस महत्त्वाचा वाटत होता. महाविकासआघाडीच्या बैठकांवर बैठका सुरु होत्या. पण अचानक सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. त्यानंतर अजित पवारांचं मन वळवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरु झाले.

अजित पवार यांनी बंड का केले? हा प्रश्न अजुनही गुलदस्त्यात आहे. पण पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्या चेकमेट पुस्तकात त्यांनी याबाबत खुलासा केला आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

पुस्तकात असं म्हटलं आहे की, शिवसेनेसोबत वाटाघाडी सुरु असताना सुप्रिया सुळे यांना अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपद तर जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री करण्याचं ठरलं. त्यानंतर अजित पवारांच्या मनात चलबिचल सुरु झाली. त्यामुळे नाराज झालेले अजितदादा बैठकीतून निघून गेले. आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी अजित पवारांनी सर्वांना धक्का देण्याचं ठरवलं.

२२ नोव्हेंबरच्या रात्री बैठकीतून अजित पवार बाहेर पडले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सोफिटल हॉटेलमध्ये चर्चा झाली. अजित पवार 38 आमदार फोडण्याच्या तयारीत होते. महत्त्वाचं म्हणजे ही सगळी माहिती सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांना देखील माहित होता. ३८ पैकी २० जणांना मंत्रिपद देण्याची चर्चा ही झाली होती. पण शरद पवारांना याबाबत काहीच माहित नव्हते.

पण सरकार जास्त काळ टिकू शकलं नाही. बहुमत नसल्यामुळे दोघांनी राजीनामा दिला. पण नंतर पुन्हा अजितदादा यांना उपमुख्यमंत्री देण्यात आलं.