मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उभा केलेला लढा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मनोज जरांगे पाटील आरक्षणांच्या मुद्द्यावरून सरकारवर घणाघाती टीका करत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांनी लावून धरलीये. तर देवेंद्र फडणवीसांवर देखील त्यांनी वेळोवेळी टीका केल्याचं दिसून आलंय. अशातच आता देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणावरून आपलं मत मांडलं अन् विरोधकांवर टीका केली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री आहे आणि अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात आता युतीची सरकार आहे, तरीही मनोज जरांगे पाटील रोज फक्त मला का लक्ष्य करतात? हा प्रश्न कोणीतरी त्यांना विचारा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. जेव्हा मी पहिल्यांदा सत्तेत आलो, तेव्हा मराठा आरक्षण लागू केलं होतं आणि सुप्रीम कोर्टात त्याची लढाई लढली. जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं, तेव्हा आरक्षणावर कोणताही ठोस पाऊल उचलला गेला नाही. ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची योग्य लढाई लढली नाही, ज्यामुळे आरक्षण संपुष्टात आले. आता भाजप पुन्हा ते लागू करण्याचा प्रयत्न करत आहे, तरीही जरांगे पाटील माझ्याविरोधात अशोभनीय भाषा वापरत आहेत, असं फडणवीस म्हणाले.
शरद पवार देखील मुख्यमंत्री राहिले आहेत. सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीचं सलग राज्य होतं. तरीही मराठा आरक्षण दिलं नाही. आधी मी दिलं त्यानंतर एकनाथ शिंदेंनी आरक्षण दिलं. पण राष्ट्रवादी काँग्रेस होते तेव्हा दिलं नाही, अशी टीका देखील फडणवीसांनी केली आहे. आम्ही मराठा आरक्षण लागू केले आणि सुप्रीम कोर्टात त्याची लढाई लढली. पण आता तिघांचं सरकार असताना फक्त मला टार्गेट करतात याचा अर्थ काय? या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर मराठा समाज राज्यातील विधानसभेच्या सर्वच 288 जागा लढवेल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यानंतर मनोज जरांगे, मराठा समाजाचे नेते आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली पाहिजे, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यावर त्याची गरज काय? म्हणत मनोज जरांगे यांनी पवारांच्या आवाहनाला विरोध केला.