हाच मनसेचा शिव धर्म का ? पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची बदनामी

फेसबुकवर ग्रुप तयार करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्याची बदनामी करणं मनसैनिकांना भलतंच महागात पडलंय.   

Updated: Apr 29, 2022, 03:49 PM IST
हाच मनसेचा शिव धर्म का ? पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची बदनामी title=

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj thackeray ) आज पुणे दौऱ्यावर आहेत. एकीकडे राज यांनी आपल्या मनसैनिकांना छत्रपती शिवाजी महाराज ( Shivaji Maharaj ) यांचे विचार अंमलात आणण्याचा सल्ला दिला असतानाच पुण्यातील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक महिला नेत्याची बदनामी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवर 'एक करोड ताईवर नाराज' असणाऱ्यांच्या ग्रुपवर जॉईन होण्यासाठी फिर्यादीना फ्रेंड रिक्वेस्ट आली. फिर्यादी यांनी ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. फिर्यादी यांना त्या ग्रुपच्या प्रोफाईलवर राष्ट्रवादिच्या नेत्या ऍड. रूपाली ठोंबरे ( Rupali Thombare ) यांचा फोटो दिसला.

विना परवानगी त्यांचा फोटो वापरून या ग्रुपवर रुपाली ठोंबरे यांची अश्लील भाषेत खिल्ली उडवत असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले.  त्यानंतर फिर्यादी यांनी महिलेविषयी अश्लील भाषेत बोलू नका अशी विनंती केली. 

मात्र, त्यानंतरही आरोपी सुधीर लाड याने पर्सनल फेसबुक अकाउंटवरून रूपाली ठोंबरे यांना शिवीगाळ करत असल्याचा लाईव्ह व्हिडिओ टाकून बदनामी केली. त्यामुळे ऍड. पुनम काशिनाथ गुंजाळ (वय 27) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

ऍड. गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सागर चव्हाण, गजानन पाटील, प्रसाद राणे, धृवराज ढकेडकर, राजेश दंडनाईक, कुमार जाधव, सचिन कोमकर, सावळ्या कुंभार, निजामुद्दीन शेख, सुधीर लाड यांच्यासह आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल केला.  भादवि कलम 354/अ, ड, 500,34 आयटी ऍक्ट क66 c 67 नुसार या सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.