पतीवर कऱ्हाडीने वार करुन पत्नीची नदीत उडी मारुन आत्महत्या

धक्कादायक प्रकार आला समोर

Updated: Jun 6, 2019, 12:17 PM IST
पतीवर कऱ्हाडीने वार करुन पत्नीची नदीत उडी मारुन आत्महत्या

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : पतीवर कु-हाडीने वार करुन पत्नीने नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घुग्गुसजवळच्या नकोडा येथे घडली आहे. या हल्ल्यात पती जखमी झाला आहे. पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीने आज पहाटे हा हल्ला केला. पतीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बबन सोयाम यांच्यावर पत्नी अर्चना सोयाम यांनी हल्ला केला. 

चंद्रपूर शहराजवळ असलेल्या नकोडा येथील घरी दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यातून पत्नीने पती बबन सोयामवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात पती किरकोळ जखमी झाला. घटनेनंतर अर्चना सोयाम हिने वर्धा नदीकडे धाव घेत स्वतः नदीत उडी घेत आत्महत्या केली. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक धावून आले. पती बबन सोयाम याला चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान पोलिसांनी वर्धा नदी किनारा गाठून पत्नीचा मृतदेह पाण्याबाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी रवाना केला. चारित्र्यावर संशय घेतल्याने एक कुटुंब उध्वस्त झाले. घुग्गुस पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.