नितेश राणे यांना अटक होणार की नाही? काय म्हणाले वकील

नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार

Updated: Feb 1, 2022, 04:17 PM IST
नितेश राणे यांना अटक होणार की नाही? काय म्हणाले वकील title=

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. 

आमदार नितेश राणे यांच्यासाठी अॅड. सतीश मानेशिंदे यांनी तर सरकारी वकिल म्हणून अॅड. प्रदीप घरत यांनी सोमवारी युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने मंगळवारी म्हणजे आज दुपारपर्यंत निकाल राखून ठेवला होता. पण आज सुनावणी करताना न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन नाकारला आहे. दरम्यान, हायकोर्टात अर्ज करु असं नितेश राणेंच्या वकिलांनी सांगितलं आहे.

सरकारी वकिलांचा युक्तीवाद
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नितेश राणे यांनी पहिल्यांदा शरण यावं आणि त्यानंतर जामीन अर्ज करावा, पण शरण न येताच अर्ज केल्याने हा अर्ज कोर्टासमोर राखण्याजोगा नाही असं कोर्टाने सांगितल्याची माहिती सरकारी वकील अॅड. प्रदीप घरत यांनी दिली. एकदा शरणागती स्विकारल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाशिवाय कुठेही जाता येणार नाही, असं आमचं म्हणणं होतं, अशी माहिती अॅड. प्रदीप घरत यांनी दिली.

नितेश राणे यांच्या वकिलांचं काय म्हणणं
सुप्रीम कोर्टाने अटकेपासून १० दिवसांचं संरक्षण दिलं असल्याने आमदार नितेश राणे यांना अटक करता येणार नाही, असं कोर्टाने सांगितलं आहे अशी माहिती नितेश राणे यांचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी दिली. पोलिसांची दादागिरी सुरु असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन असल्याचं अॅड. सतीश मानेशिंदे यांनी म्हटलं आहे. पोलिसांना कोणत्याही प्रकारे नितेश राणे यांना अटक करायची आहे, हा मुद्दा आम्ही सुप्रीम कोर्टात मांडू, नितेश राणे यांना हात लावला तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होईल असंही अॅड. सतीश मानेशिंदे यांनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?  
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीदरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला जीवघेणा हल्ला झाला होता. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी आपल्यावर शस्त्राने हल्ला केल्याचा दावा संतोष परब यांनी केला आहे. या हल्लामागे भाजप आमदार नितेश राणे असल्याचा आरोप संतोष परब यांनी केला होता. संतोष परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय आहेत.