इस्कॉन मंदिर जाळल्याने संतापलेल्या उद्धव ठाकरेंचे आव्हान, 'मोदींनी युक्रेनप्रमाणे बांगलादेशच्या हिंदुंना..'

Uddhav Thackeray: काल आमच्या खासदारांनी पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. पण त्यांनी ती दिली नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Pravin Dabholkar | Updated: Dec 13, 2024, 01:39 PM IST
इस्कॉन मंदिर जाळल्याने संतापलेल्या उद्धव ठाकरेंचे आव्हान, 'मोदींनी युक्रेनप्रमाणे बांगलादेशच्या हिंदुंना..' title=
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray: बांगलादेशात हिंदु सुरक्षित नाही. बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदूंवर हल्ले होतायत. बांग्लादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होत असतील तर त्यांच्या देशातील क्रिकेट टीमसोबत खेळणं किती योग्य आहे? असे आम्ही विचारले पण त्यावर काही कारवाई झाली नाही. बांगलादेशमध्ये इस्कॉनचे मंदिर जाळलं. तिथल्या गुरुंना अटक केली. जस युक्रेनचं युद्ध चालवलं तसं बांगलादेशमधील हिंदूंना वाचवणार का? असे आव्हान उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केले. 

काल आमच्या खासदारांनी पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. पण त्यांनी ती दिली नाही. मणिपूरप्रमाणे बांगलादेशमध्ये अत्याचार सुरु आहे. यावर केंद्राची भूमिका काय आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. शेख हसिना इकडे आल्या त्या सुरक्षित आहेत. बांगलादेशमध्ये इस्कॉनच मंदिर जाळलं. दुसरीकडे दादर स्थानकाजवळचं हमालांनी बांधलेलं  80 वर्षांपूर्वीचं मंदिर पाडायला निघाले आहेत. मग भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या काय? भेटीची वेळ न दिल्याने मला मीडियाच्या माध्यमातून हा प्रश्न विचारावा लागतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाल्या. भाजपचं हिंदुत्व फक्त निवडणुकीपुरतंच मर्यादित आहेत का? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरेंनी कंबर कसली

हिंदुत्ववादी भूमिका सोडली म्हणून उद्धव ठाकरेंची पिछेहाट झाली असं काही नेत्यांना वाटू लागलंय. त्यामुळं उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेची निवडणूक समोर ठेऊन पुन्हा बाळासाहेबांच्या आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्धव ठाकरेंसाठी आता करो वा मरोची लढाई आहे. बीएमसी हे सत्ताकेंद्र ताब्यात न राहिल्यास उद्धव ठाकरेंचं आणि त्यांच्या शिवसेनेचं राजकीय अस्तित्व टिकवणं कठीण होऊन बसणार आहे.पुढच्या काही दिवसांत मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे. विधानसभेची पुनरावृत्ती बीएमसी निवडणुकीत होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापासून कंबर कसलीय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला उद्धव ठाकरे लागलेत. उद्धव ठाकरेंकडे असलेल्या माजी नगरसेवकांपैकी जवळपास 35 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली. त्यामुळे आहेत त्या नगरसेवकांना पुन्हा निवडून आणणं आणि एकनाथ शिंदेकडे गेलेल्या नगरसेवकांना पर्याय देऊन त्या ठिकाणी विजय मिळवण्याचं आव्हान सध्या उद्धव ठाकरेंसमोर आहे.विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाची मोठी पिछेहाट झालीय. मुंबईतल्या काही जागा राखण्यात उद्धव ठाकरेंना यश आलंय. त्या जोरावर बीएमसी निवडणुकीसाठी मशागत करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. उद्धव ठाकरेंनी बीएमसी निवडणुकीसाठी रणनिती तयार केली आहे. यानुसार हिंदुत्वाचा मुद्दा मुंबईकरांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न ठाकरेंचा राहणार आहे. हिंदुत्व सोडल्याच्या आरोपांवर योग्य तो प्रतिवाद केला जाणार, विधानसभेत शिवसेना UBTचा उमेदवार पिछाडीवर होता तिथं लक्ष केंद्रीत करणे, पक्ष सोडून गेलेल्या प्रभागात पर्यायी नेतृत्व उभं करणे, शाखाप्रमुखांना संघटनेकडून अधिक ताकद देणे, पक्षात नाराज असलेल्यांची नाराजी दूर करणे अशी रणनिती उद्धव ठाकरेंनी आखल्याचे समोर आलंय.