पत्नीची हत्या करून शरीराचे तुकडे १० दिवस फ्रीजमध्ये ठेवले!

बीडमध्ये धक्कादायक घटना उघडकीस

Updated: Dec 10, 2019, 09:45 AM IST
पत्नीची हत्या करून शरीराचे तुकडे १० दिवस फ्रीजमध्ये ठेवले!

बीड : बीडमधून एक धक्कादायक बातमी उघडकीस आलीय. बीडमध्ये एका पतीनंच आपल्या पत्नीला ठार करून तिच्या मृतदेहाचे तुकडे तब्बल १० दिवस आपल्या घरातील फ्रीजमध्ये लपवून ठेवल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय. बीडच्या माजलनगर परिसरात ही घटना घडलीय. चारित्र्याच्या संशयावरून स्वत:च्या पत्नीची हत्या करणाऱ्या संजय साळवे उर्फ अब्दुल रहेमानला पोलिसांनी अटक केलीय. माजलगाव शहरात सोमवारी आढळलेल्या अर्धवट जळालेल्या प्रेतामुळे या खुनाचा उलगडा झाला.

रेश्मा संजय साळवे असं मृत महिलेचं नाव आहे. पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. त्यातूनच दोघांमध्ये झालेल्या भांडणात संजयचा स्वत:वरचा ताबा सुटला आणि त्यानं ३० नोव्हेंबर रोजी रेश्माचा खून केला. रेश्मा पठाण आणि संजय साळवे यांचा प्रेमविवाह होता, असंही समोर येतंय. संजयनं कुटंबियांविरोधात जाऊन रेश्माशी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यानं अब्दुल रहमान असं नाव धारण करत मुस्लीम धर्मही स्वीकारला होता. परंतु, या प्रेमाचा शेवट मात्र असा झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतेय. संजय आणि रेश्मा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

१० दिवसांपूर्वी संजय याने आपल्या पत्नीचा धारदार शस्त्राने खून करून तिच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे केले आणि घरातीलच फ्रीज मध्ये ठेवले होते. या विकृत व्यक्तीनं पत्नीच्या शरिराचे तुकडे करुन १० दिवस घरातील फ्रीजमध्ये ठेवल्याचं निदर्शनास आल्यानंतर तपास अधिकारीही चक्रावले. दहा दिवस हे तुकडे घरात ठेवल्यावर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यानं शरीराच्या वरचा भाग सोमवारी शहरातील ओसाड जागेवर जाळून टाकण्याचा प्रयत्नही केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला. या प्रकरणी संजय साळवे यास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.